पुण्यात काळ्या बाजारात नेण्यात येणारा शासकीय स्वस्त धान्याचा साठा जप्त…


पुणे( परििवर्तनाचा सामना )काळ्या बाजारात नेण्यात येणारा शासकीय स्वस्त धान्याचा ८०० क्विंटल तांदळाचा साठा गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. ११) रात्री जप्त केला. हडपसर येथे केलेल्या या कारवाई तांदळाने भरलेले तीन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील धान्याची किमत ९७ लाख रुपये आहे. दरम्यान, तांदूळ वाहतूक करण्यासाठी जीएसटीच्या बनावट पावत्याही तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

श्री कानकलक्ष्मी ॲग्रो ट्रेडर्स, जय आनंद फूड इंडस्ट्रीज व मुबारक ट्रान्स्पोर्ट या कंपन्यांच्या मालकांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रात्री स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी शासकीय धान्याची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक हडपसर येथील १५ नंबर येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हडपसर येथे सापळा रचला

. त्यावेळी श्री कानकलक्ष्मी ॲग्रो ट्रेडर्स, जय आनंद फूड इंडस्ट्रीज व मुबारक ट्रासपोर्ट या कंपन्यांचे तीन ट्रक व त्यांच्या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या ट्रकमधून शासकीय स्वस्त धान्य योजनेचा ८०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी चालकांची कसून चौकशी केल्यानंतर संबंधित तांदूळ हा रेशनिंगचा असून तो खोपोली येथे खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस कर्मचारी किशोर वग्गू, संजय जाधव, मोहसीन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Latest News