भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी बुधवारी (दि.१६) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता, आज सकाळी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बोराटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांना मोठा झटका बसला आहे. आमदार लांडगे यांच्या मनमानीला कंटाळून रखडलेली विकास कामे व्हावीत म्हणून भाजपा सोडली असल्याचे बोराटे यांनी सांगितले.भाजपाचे तब्बल २४ नगरसेवक एक एक करत पक्षाला रामाराम ठोकून सरळ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. बोराटे यांनी त्याचा नारळ फोडला.

मुंबई येथील पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह मुख्य प्रवक्ते तथा निवडणूक प्रभारी योगेश बहल, महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, नगरसेवक मयूर कलाटे, आतिश बारणे, समाजिक कार्यकर्ते प्रदीप आहेर, विशालशेठ आहेर उपस्थित होते.मोशी प्रभागातून आता बोराटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. गव्हाणे आणि आल्हाट यांच्या नियुक्तीनंतरचा हा पहिलाच प्रवेश आहे. यापूर्वी भाजपाशी सलग्न अपक्ष नगरसेवक कैलास बारणे तसेच भाजपा नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे, नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष लोखंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजपाचे सुमारे २४ नगरसवेक पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत. १३ मार्च पर्यंत महापालिकेची मुदत असल्याने पक्षांतरबंदी कायद्याची कारवाई टाळण्यासाठी सर्वजणांचे प्रवेश थांबले आहेत.

Latest News