पंजाबी कलाकार दीप सिद्धूला आकुर्डीतील गुरुद्वारात शीख बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण


पंजाबी कलाकार दीप सिद्धूला आकुर्डीतील गुरुद्वारात शीख बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण
पिंपरी, प्रतिनिधी :
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धू याला आकुर्डी येथील श्री वाहे गुरू गुरुनानक मानसरोवर गुरुद्वारामध्ये शीख बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच श्रीगुरू ग्रंथसाहेबमधील अखंड पाठांचे पठण केले. त्यानंतर कीर्तन आणि भोग करून अंतिम अरदास करण्यात आले.
शीख बांधवांमध्ये पंजाबी कलाकार दीप सिद्धू प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. आकुर्डीतील श्री वाहे गुरू गुरुनानक मानसरोवर गुरुद्वारामध्ये दोनशेपेक्षा जास्त शीख नागरिकांनी एकत्र येत दीप सिद्धूच्या आकस्मिक जाण्याबद्दल दुःख व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली. तद्नंतर सर्वांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ शीख बांधवांनी घेतला.
पंजाबी कलाकार दीप सिद्धू याचा कार अपघातात मृत्यू झाला. दीप सिद्धू म्हणजे ज्यावेळी किसान आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनाला त्याने जाहीर पाठींबा देत तो सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह झाला होता. एप्रिल महिन्यात दीप सिद्धूला जामीन मिळाला, पण बाहेर आल्यावर लगेच त्याला अटक केली गेली. पुन्हा एप्रिलच्या अखेरीस त्याला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. दिल्ली पोलिस जेव्हा त्याला बोलावतील त्यावेळी त्याला हजर राहावे लागेल या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. लाल किल्ला परिसरात झालेल्या दंगलीच्या कारस्थानात त्याचा हातभार असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याचा मृत्यू चाहत्यांसाठी दुःखद क्षण होता.
दरम्यान, आकुर्डी येथील श्री वाहे गुरू गुरुनानक मानसरोवर गुरुद्वारा मार्फत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रणी भूमिका घेतली जाते. कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांना मदतीचा हात देत त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. याबरोबरच थंडीच्या दिवसात पदपथावरील गोरगरिबांचे थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी या लोकांना मोठ्या प्रमाणावर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या गुरुद्वाराने अशी सामाजिक भूमिका जपत नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे. पंजाबी कलाकार दीप सिद्धूच्या अचानक जाण्याने शीख बांधव दुःखी झाले आहेत. शीख बांधवांनी गुरुद्वारामध्ये एकत्र येत दीप सिद्धूला श्रद्धांजली अर्पण केली.