कोरोनाच्या खास सभेचा सत्ताधार्‍यांसह विरोधकांना पडला विसर…

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात६७ (३) क या नियमाखाली तातडीची कामे म्हणून विविध कामे व विविध साधन सामुग्रींची खरेदी केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कोटेशन व निविदांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. या काळात सीएसआरच्या माध्यमातूनही कोट्यवधींची खरेदी व कामे करण्यात आली.रुग्णालय व कोवीड केअर सेंटरसाठी लागणारे साहित्य, औषधे, रुग्णांसाठी कपडे, फर्निचर, ऑक्सीजन निर्मितीसाठी प्रकल्प, जेवण, अशा विविध प्रकारच्या कामांना व निविदांना स्थायी समितीने मुख्य सभा मंजुरी देईल, या भरोशावर मान्यता दिली. स्थायीच्या मान्यतेनंतर कोट्यावधींची खरेदी व कामे करण्यात आली. मात्र, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनीही अनेकवेळा मुख्यसभेत केला. तसेच यासंदर्भात सभागृहात माहिती देण्याची मागणीही केली. यावर प्रत्येकवेळी कोरोनावर खास सभा घेण्याचे व त्यात सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी दिले. कोरोना काळात तातडीची कामे म्हणून६७ (३) क या नियमाखाली करण्यात आलेल्या विविध कामांवर आणि खरेदींवर चर्चा करण्यासाठी खास सभा बोलावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती हवेतच विरल्याचे पहायला मिळाले. वारंवार खास सभा घेण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी आणि वारंवार चर्चा करण्याची मागणी करणारे विरोधक अशा दोघांनाही कोरोनाच्या खास सभेचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहेआता कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. सभासदांची मुदतही १४ मार्च रोजी संपत आहे. ठेकेदारांनी सुध्दा शंभर टक्के काम केले आहे. मुख्य सभेची मान्यता नसल्यामुळे त्यांचे काही प्रमाणात बिले राहिली आहेत. मात्र, कोरोनाच्या खास सभेला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही. त्यामुळे कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप आणि यावर खास सभा घेण्याचे सत्ताधार्‍यांनी दिलेले आश्वासन दोन्ही हवेत विरल्याचे पहायला मिळत आहे.

Latest News