आमदार महेश लांडगे यांच्या निधीतून से.क्र.२२ला प्रशस्त रुग्णालय उभारा: सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

पिंपरी: प्रभाग क्र.१३ मधील से.क्र.२२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयातील मोकळ्या जागेत प्रशस्त रुग्णालय व्हावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. परंतु रेडझोनचे कारण देत या ठिकाणी अद्याप रुग्णालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या महत्त्वाच्या बाबीचा विचार करून संरक्षण विभागाची विशेष परवानगी घेऊन आमदार निधीतून सेक्टर क्र.२२ या ठिकाणी प्रशस्त रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांना दिलेल्या निवेदनात दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की,येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. प्रभाग क्र.१३ मधील से.२२ या ठिकाणी असणारे यमुनानगर रुग्णालयात महिला प्रसूतिगृह, ओपीडी तसेच अनेक उपचार याठिकाणी होत असतात. रुपीनगर, तळवडे, सेक्टर नं.२२,निगडी,यमुनानगर,त्रिवेणीनगर,सहयोगनगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी कमी दरात उपचार उपलब्ध मिळतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता या ठिकाणी कोणतेही शासकीय रुग्णालय नाही.रात्री-अपरात्री नागरिकांना अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात जावे लागते. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो, यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबी लक्षात घेता येथे प्रशस्त रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या विनंती अर्जाचा सकारात्मक विचार करून रुग्णालयाच्या निर्मिती बाबत योग्य ते पाऊल उचलण्यात यावे, असे दिपक खैरनार यांनी म्हटले आहे.

Latest News