खंडणी प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित…
मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसुली प्रकरणात आरोपी असलेल्याअधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री यांनी निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली आहे. त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पण अद्याप ते हाती लागलेले नाहीत. त्यातच आता ठाकरे सरकारने त्यांचं निलंबन केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणात मागील आठवड्यात त्रिपाठी यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावावर सही केली आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाले आहे
अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी वसुली प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील ओम वंगाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.प्रा्प्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.
त्रिपाठी हे २०१० च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं.त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. तिथेच त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली. पण त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.