धक्कादायक: पुण्यात मुलींच्या शाळेतच मुलीवर बाथरुममध्ये अत्याचार

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – )येरवडा येथील शाळेत शिरुन एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खूनी हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन एका नराधमाने ११ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन अत्‍याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्‍या एका ४० वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत.

शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे.

फिर्यादी यांची ११ वर्षांची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करुन तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनिषा जाधव तपास करीत आहेत.

Latest News