राजेंद्र जगताप लढवणार खुल्या गटातून दोन ठिकाणी निवडणूक….

पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -आगामी महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला, तरी इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप हे खुला पुरुष प्रभाग असेल अशा दोन ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. याची जोरदार तयारीही त्यांनी सुरू केल्याचे दिसते.

           राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या संपर्क अभियानातही राजेंद्र जगताप यांनी आपल्या भाषणातून याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार त्यांनी दोन्ही प्रभागात तयारी सुरू केली आहे. मात्र, हे दोन्ही प्रभाग कोणते असतील, याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. नागरिकांच्या इच्छेनुसार दोन्ही प्रभागांमधून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण नगरसेवक असताना पिंपळे गुरवच्या विकासात दिलेले योगदान जनता विसरणार नाही. 

            सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यावेळी विकासकामांचे नियोजन केले होते. त्यातील जवळपास सर्व कामे पूर्णत्वास नेण्यात यश आले. तर काही विकासकामांच्या वर्कऑर्डर 2019 पर्यंतच्या होत्या. त्यातील महत्त्वाची कामे म्हणजे पिंपळे गुरवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरवमध्ये आणण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. तसेच राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरणाचे कामही राजेंद्र जगताप यांच्याच कार्यकाळात हाती घेण्यात आले. आज हे उद्यान पिंपळे गुरवच्या सौंदर्याचे केंद्रबिंदू ठरले आहे. मोरया पार्कसाठी रस्त्याची कामे पूर्ण करून नागरिकांची कायमस्वरूपी समस्या सोडविली. याबरोबरच अनेक सोसायट्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. 

           सध्या नागरिकांच्या भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचार मोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान नागरिकांकडून मनाला सुखावणारे क्षण अनुभवण्यास मिळत आहेत. आपल्याच प्रभागातून आपण निवडणूक लढवा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे राजेंद्र जगताप दोन्ही प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. 

Latest News