कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा : रामदास काकडे

इंद्रायणी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी :

सातवाहन, यादव, ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक व्यक्तींनी महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली. कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या कष्टातून महाराष्ट्र उभा असल्याने आपण हा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात संपन्न झालेल्या ध्वजारोहन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रामदास काकडे बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवराज काकडे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संभाजी मलघे, फार्मसी विभागाचे संचालक डॉ. बी. बी. जैन, प्राचार्य डॉ. चोपडे, शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे, होळकर, घाडगे आदी योद्ध्यांनी मराठी साम्राज्याची पताका अटकेपार रोवली. संपूर्ण भारतीय उपखंडात दबदबा असणारे मराठी साम्राज्य छत्रपती शिवरायांनी शंभर मावळ्यांच्या साथीने उभे केले होते, असा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असल्याचे काकडे यांनी सांगितले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक असलेले आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी आणि १०५ हुतात्मे यांचे स्मरण आजच्या दिवशीच नाही, तर रोज करायला हवे. म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळत राहील, असा आशावादही रामदास काकडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या १०५ योद्ध्यांना विसरून चालणार नाही. आजचा आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. आचार्य अत्रेंसारखे साहित्यिक, ना.ग.गोरे, एस. एम. जोशी ते नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या सर्वांच्या मार्गदर्शनात हा पुरोगामी महाराष्ट्र वाटचाल करीत असल्याचे मत प्राचार्य डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, इंद्रायणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. चंद्रकांत शेटे यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणशास्त्र विभागाचे संचालक प्रा. सुरेश थरकुडे यांनी केले.

Latest News