मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस .

पुणे :ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत न उतरविल्यास तेथे हनुमान चालिसा पठण करा, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभुमीवर रमजान ईदपासूनच शहरात पुणे पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यादृष्टीने बैठका घेऊन संबंधितांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारपासूनच मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. त्याचबरोबर मंगळवारपासूनच शहरात सगळीकडे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर राज ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्‍वभुमीवर बुधवारी पहाटेपासूनच तीन ते साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत नारायण पेठेतील खालकर चौकामध्ये मनसेने महाआरतीचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मनसेचे अजय शिंदे यांच्यासह अकरा जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले. त्याचबरोबर अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करिश्‍मा चौकातल हेमंत संभुस यांच्यासह 10 ते 12 जणांना, फरासखाना पोलिसांनी रविवार पेठेतील बंदिवान हनुमान मंदिर येथे प्रशांत कनोजीया यांच्यासह 4 जणांना, वारजे माळवाडी येथे कैलास दांगट यांच्यासह 10 जणांना, तर कोंढवा येथे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या निवासस्थानासमोर अमोल शिरस, रोहन गायकवाड, अमित जगताप व गणेश बाबर यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे चार एप्रिलपर्यंत उतरविण्याबाबत दिलेल्या आदेशानंतर बुधवारी शहरामध्ये तीन ते चार ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी 292 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यापैकी 58 जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले, तर 234 जणांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही”शहरातील परिस्थिती नेहमीप्रमाणेच सुरळीत आहे. शहरात बुधवारी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. आवश्‍यक त्या व्यक्तींना नोटीस दिली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत. बुधवारी सकाळी लाऊडस्पिकर वर अजान झालेली नाही. शहरात कोणी ठरवून अनुचित प्रकार घडवू इच्छित असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”

– अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.