फलटणकरांचा कार्यकाळ आता संपला. लवकरच आमचा कार्यकाळ सुरु होणार – खासदार निंबाळकर

सातारा :. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस फलटणच्या रावणाकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे. मात्र, फलटणकरांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. लवकरच आमचा कार्यकाळ सुरु होणार आहे. परमेश्वर त्यांच्याकडे नक्कीच बघणार आहे, त्यामुळे सर्वच विरोधकांनी शिष्टाचाराचे राजकारण करावे, अशी कडवट टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहें

माण तालुक्यातील बोराटवाडी येथे आयोजित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार निंबाळकर अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, भगवानराव गोरे, अर्जुन काळे, धनाजी जाधव, अतुल जाधव, सिध्दार्थ गुंडगे, वसंतराव मासाळ, हरीभाऊ जगदाळे, विलासराव देशमुख, संजय गांधी, अकील काझी, सोमनाथ भोसले, बाळासाहेब माने, अर्जुन खाडे, विशाल बागल शिवाजी जगदाळे आणि माण तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

जयकुमार गोरेंनी गेल्या १३ वर्षात माण-खटाव मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला आहे. त्यांनी उरमोडीच्या दोनशे किलोमीटर लांबीच्या कॅनॉलची रेष मारली आहे. त्यांनी दुष्काळी मातीला पाणी द्यायचे, मोठे काम केले आहे. विरोधकांनी त्यापेक्षा मोठी रेष मारायची हिम्मत दाखवावी. जयाभाऊ शब्द पाळणारे नेते आहेत. टेंभूचे पाणी आमच्या छाताडावरुन पुढे नेले, तर कॅनॉल आणि ब्रीज उडवून देईन, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. जिहेकठापूरसाठी आम्ही केंद्रातून निधी आणल्यानेच योजनेची उर्वरित कामे मार्गी लागत आहेत. भाऊ सगळ्या बाजूने खमके नेतृत्व आहेत; म्हणूनच त्यांना भाजप जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढण्याची भीती वाटल्यानेच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले आहे

फलटणकरांची आता साठी बुद्धी नाठी अशी अवस्था झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. माण तालुक्यातील काही प्रवृत्ती जिहेकठापूरचे पाणी तालुक्यात येऊ नये; म्हणून प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींना थारा देवू नका, असे आवाहनही त्यांनी केलेतालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले, बहुआयामी नेतृत्व असलेल्या आमदार गोरेंनी माढ्यात राष्ट्रवादीच्या भ्रमाचा भोपळा फोडला होता. पाणीप्रश्न इतर विकासकामांसाठी थेट पंतप्रधान मोदींकडून निधी आणणारे आमचे नेतृत्व सर्व बाजूंनी सक्षम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. हॅट्‌ट्रीक आमदार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप वर्चस्व निर्माण करणार आहे. भाजपच्या केंद्रातील योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला अनेक लाभ मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.प्रताप भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादीतून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेशही केला.

Latest News