सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही- एकनाथ शिंदे


विधानसभा निवडणूकीपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यामुळे आजचा दिवस तिनही पक्षांसाठी महत्वाचा ठरणार आहे. दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. या बैठकीत सरकार बरखास्त करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.आमच्याकडे ४० हून जास्त आमदार आहेत. दिवंगत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नाही. उद्धव ठाकरेंनी निवडलेला गटनेता नियमबाह्य आहे. गटनेता निवडताना मेजॉरिटी लागते. आमच्याकडे ४६ आमदार आहेत. आमची रणनीती पुढे कळेलच. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच राहणार, माझ्यासोबत असलेले आमदार हिंदुत्त्वाशी एकनिष्ठ असलेले आमदार आहेत,’ असा दावा एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.पुढील काही तास राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणार, हे निश्चित आहे. पण आता महाविकास आघाडी सरकार काय भूमिका घेणार, एकनाथ शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलणार यावर सर्व घडामोडी अवलंबून आहेत. पण शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी विधानसभा बरखास्तीबाबत केलेल्या ट्विटमुळे आता ठाकरे सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेयांनी काल ट्विट करत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला. ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत…बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे…बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्यावर इशारा दिला आहे. याच भूमिकेवर आजही एकनाथ शिंदे ठाम असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आहे.