वेल्हे तालुक्याचे नामांतर: मुख्यमंत्र्यांना राजगड तालुका नामांतराचा प्रस्ताव


Pune – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगड किल्ल्यावरुन जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचा हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. स्वराज्याची पहिली राजधानी व स्वराज्यातील पहिला तालुका असलेल्या राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या त्रिशत अमृतमहोत्सवी (३७५ वर्ष) वर्षांत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे.
शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, मावळा संघटनेचे अध्यक्ष दत्ता नलावडे, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस, रोहित नलावडे, युवराज काकडे व तालुक्यातील ग्रामस्थांनी आज दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांना राजगड तालुका नामांतराचा प्रस्ताव देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांना शिवकाळात राजगड तालुका असलेली ऐतिहासिक कागदपत्रे सादर करण्यात आली.छत्रपती शिवरायांची कर्मभूमी असलेल्या राज्यातील अति मागास वेल्हे तालुक्याचे नामांतर लवकरच राजगड तालुका असे होणार आहे.
तशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारी (दि. ३) मावळा जवान संघटना व तालुक्यातील शिष्टमंडळाला दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे असे सांगितले.
१६४७ मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. १६४८ ते १६७२ असे २५ वर्षे राजगडावरून राज्यकारभार पाहिला. वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करुन शिवरायांच्या विश्ववंदनिय लोककल्याणकारी कार्याचा राज्यासह देशभरात तसेच जगभरात गौरव होणार आहे. शिवरायांची राजधानी व जगातील सर्वोत्कृष्ट किल्ला, राजगडाची भारतीय लोकशाही राष्ट्रातील तालुका नावाने पुन्हा ओळख होणार आहे
. स्वराज्य स्थापनेनंतर शिवरायांनी तालुका, प्रांत, परगणा व सुभा अशी रचना केली. तेंव्हापासून ब्रिटिश राजवटी पर्यंत राजगड तालुका अस्तित्वात होता. शिवरायांच्या मुलकी, सैन्य, प्रशासकिय व इतर लोककल्याणकारी कार्याचा जगभरात लौकिक आहे.
राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. राज्यात शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या नावाने गावे, शहर, तालुके, जिल्हे आहेत. वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यात यावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने ठराव केले आहेत. जिल्हा परिषद, स्थानिक आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींही मागणी केली आहे. तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी नामांतराचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत.