शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज : फ्रान्सिस जेकबविजेत्या स्पर्धकांचा टॅब, सायकल, रोबोटिक किट देऊन गौरव


शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज : फ्रान्सिस जेकबविजेत्या स्पर्धकांचा टॅब, सायकल, रोबोटिक किट देऊन गौरव
पिंपरी,पुणे (दि. ७ नोव्हेंबर २०२२) एकविसाव्या शतकातील पिढीची बुध्दी अतिशय तल्लख आहे. या विद्यार्थ्यांची अनुकरण शक्ती, कल्पना शक्ती प्रगल्भ आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसाठी विविध साधनांच्या सहाय्याने ते प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते.
आता काळाची गरज ओळखून आपल्या शिक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे असे मत, सेंट एन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष फ्रान्सिस जेकब यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरणातील सेंट एन्स एज्युकेशन सोसायटीच्या सेंट मेरी शाळेत नुकतीच आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्यांना जेकब यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यावेळी जेकब बोलत होते. दोन गटात झालेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील विविध शाळांमधील सुमारे अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यामधून छोट्या गटातील ज्ञानदा चव्हाण (मॉडर्न हायस्कूल), अमोल साळुंखे (एसपीएम हायस्कूल), आरव कचरे (एसपीएम हायस्कूल), तर मोठ्या गटातील शनय पवार (ऊर्सला हायस्कूल), अबिर कळसकर (एसपीएम इं. स्कूल), आराध्या कवळे (ऊर्सला हायस्कूल) या विद्यार्थ्यांना अनुक्रमे टॅब, सायकल, रोबोटिक किट आणि वेदांग चौरसिया (ऊर्सला हायस्कूल), हरीप्रिया पटेल (मॉडर्न हायस्कूल), रीवा विसवादीया (सेंट मेरी स्कूल), ग्रीवा कोकणे (मॉडर्न हायस्कूल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
मुख्याध्यापिका मधुबाला गैरोला म्हणाल्या, सेंट मेरी शाळेत अतिशय माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याचबरोबर रोबोटिक सायन्स, योगा, संगीत, विविध क्रीडा प्रकार शिकवून बौद्धिक, मानसिक विकासाला चालना देऊन कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात.
स्वागत मुख्याध्यापिका मधुबाला गैरोला आणि सुत्रसंचलन धनश्री नित्सुरे तर आभार शिल्पा कलघटगी यांनी मानले. संयोजन गिरीजा मोहिते, संजय पोखरकर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.——–