फुरसुंगी आणि उरुळी देवाची हे दोन गावे बाहेर पण उर्वरित गावातील मिळकतकराची समस्या कायम…

पुणे -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे महापालिकेत समाविष्ट ११ गावांपैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची हे दोन गावे बाहेर पडली आहेत. पण उर्वरित ९ गावातील मिळकतकराची समस्या कायम आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना दिलासा देता येईल का यासाठी सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
पुढील पंधरा दिवसात या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांना महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उर्वरित ९ गावांसाठी महापालिकेत बैठक घेतली. त्यामध्ये मिळकतकर आणि पाणी या दोन विषयावर चर्चा झाली
.पत्रकारांशी बोलताना विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शिवतारे यांच्यासोबत आज ९ गावांमधील मिळकतकर आणि पाणी समस्येवर चर्चा झाली. २०१७ मध्ये ११ गावांना एकाच पद्धतीने मिळकतकर लावला होता. दोन गावे वगळण्यात आल्याने उर्वरित ९ गावांसाठी मिळकतकरात सुधारणा करून नागरिकांना दिलासा देता येईल का यावर चर्चा झाली.
त्यामध्ये या गावात लावला गेलेला कराचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती गठित केली आहे. पुढील १५ दिवसात या समितीचा अहवाल सादर होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल
.९ गावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सल्लागार नेमून आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे शिवतारे यांना सांगण्यात आले. पण ही दीर्घकालीन उपाय योजना आहे. लोकांना लगेच दिलासा देता यावा यासाठी काही करावे अशी मागणी शिवतारे यांनी केली. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाला या ९ गावांमधील काय स्थिती आहे ते तपासून त्याचा अहवाल सात दिवसात सादर करावा, असे आदेश दिले असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.