दशक्रिया विधी अजून झाला नाही, आणि पदाबाबत चर्चा, पुणेकर म्हणून लाज वाटते: प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर अवघ्या पाचच दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर पक्षातून नाराजी व्यक्त होत आहे
अशातच कसबा विधानसभा निवडणुकीबद्दल कुठलीही चर्चा सहन केली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी रूपाली पाटील यांना झापलं आहे. ज्यांचा दशक्रिया विधी अजून झाला नाही आणि त्याच्या पदाबाबत अशी चर्चा करणे म्हणजे एक पुणेकर म्हणून लाज वाटते, अशी भूमिका प्रशांत जगतापांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी पक्षाने आदेश दिला तर कसबा विधानसभा निवडणूक लढवेल अशी भूमिका जाहीर केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे देखील बोलले जात होते
काही दिवसांपूर्वीच मुक्ताताई टिळक यांचे निधन झालं. त्यांचं जाणं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक धक्का आहे. त्यांचा दशक्रिया विधी व्हायला अजून चार-पाच दिवस आहेत असं असताना सुद्धा राजकीय पक्ष आतील लोक कसबा विधानसभा मधील निवडणूक यासंदर्भात चर्चा करतात.मी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सूचना देतोय की अशा प्रकारची चर्चा इथून पुढे सहन केली जाणार नाही
माझ्याही पक्षातील मंडळींना मी सक्तीच्या सूचना दिल्या आहेत की कोणीही याबाबत चर्चा करणे योग्य नाही. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की ही पुण्याची संस्कृती नाही. ज्यांचा अजून दशक्रिया विधी झाला नाही पण तत्पूर्वी अशा चर्चा होणे म्हणजे एक पुणेकर म्हणून लाज वाटण्यासारखा आहे असंही ते म्हणाले आहेत.