कोरोना काळात रॅपिड अँटिजेन कीटमध्ये घोटाळा,डॉक्टर वर कारवाई करणार :आयुक्त विक्रम कुमार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – वारजे येथील पुणे महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यात कोरोना काळात रॅपिड अँटिजेन कीटमध्ये घोटाळा झाल्याचं गोपनीय अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेल्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे

 वारजे येथील पुणे महापालिकेच्या अरविंद बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये अँटिजन कीटचा वापर करण्यात आला. त्यामध्ये रुग्णालयाला देण्यात आलेल्या १८ हजार ५०० अँटीजेन कीटपैकी सुमारे ६० टक्के रुग्णांची बोगस नोंदणी केली व या कीट खासगी लॅबला विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता

. आता बारटक्के येथील अँटिजन कीट(Antigen Kit) मध्ये घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर याप्रकऱणी मोठी अपडेट समोर आली आहे. अँटिजेन कीट घोटाळा प्रकऱणी पुणे पोलिसांची एन्ट्री झाली असून अधिकार्यांची चौकशी करण्यात येणार आहे

.वारजे येथील महापालिकेच्या बारटक्के दवाखान्यात कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या होत्या. यात अनेक परप्रांतीय नागरिकांचे नंबर देण्यात आले. इतर तपासणी केंद्रांवर नागरिकांनी चाचणी केली असली तरी त्यांनी बारटक्के दवाखान्यात तपासणी केल्याचे दाखवण्यात आले. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार महापालिकेचे डॉ. सतीश कोळसुरे यांनी केली होती.

पण आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.या प्रकऱणाची वारजे पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी १६५ नोंदीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केवळ १८ जणांची टेस्ट केल्याचे समोर आले. त्यामध्ये ६१ टक्के बोगस नोंदी निघाल्या आहेत. त्यामुळे एकूण १८ हजार ५०० कीटमध्ये किमान ११ हजार ३२४ कीटची नोंद बोगस असल्याची शक्यता आहे

. त्यानुसार प्रत्येक कीट ३०० रुपये प्रमाणे विकून ३३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा काळाबाजार झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे असे वारजे पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे

, आरोग्य विभागाचा चौकशीचा गोपनीय अहवाल पाहिला. त्यात रॅपिड अँटिजेन कीटच्या नोंदी जास्त झाल्या आहेत, यात प्रशासनाची चूक असल्याचे स्पष्ट आहे. पण यात नेमका आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का याची चौकशी पोलिस उपायुक्तांकडून केली जाईल असेही विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिकेचे डॉ. सतीश कोळसुरे यांनी याविरोधात मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यातच वारजे पोलिसांनी या प्रकरणात तपास करून ६० टक्क्यांहून अधिक नोंदी खोट्या असल्याची शक्यता वर्तवली व त्याचा अहवाल आरोग्य प्रमुख, महापालिका आयुक्तांना पाठवून चौकशी करण्याची सूचना केली

.त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली. दोन महिने उलटून गेले तरी त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाला नाही. प्रसारमाध्यमांनी हा विषय चव्हाट्यावर आणल्यानंतर अखेर चौकशी समितीने आयुक्तांकडे दोन आठवड्यापूर्वी हा गोपनीय अहवाल सादर केला. पण त्यावर लगेच कारवाई झाली नाही. विधिमंडळ अधिवेशनातही त्याबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

Latest News