सहकारी बँकिग क्षेत्र व्यापक करण्यासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – सहकार आयुक्त अनिल कवडे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे, दि. 17 – सहकारी बँकिग क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढविण्याबरोबरच बदलत्या काळाच्या गरजा, आव्हाने लक्षात घेऊन बँकिंग क्षेत्र अधिक व्यापक करावे अशी अपेक्षा राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आज येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती पुणे विभागाच्या वतीने नागरी सहकारी बँकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य सहकारी बँक फेडरेशन आणि सहकारी बँक असोसिएशनच्या नवनिर्वाचित संचालक व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. समारोपाच्या वेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, सहकार भारती प्रदेशाध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे, महामंत्री विवेक जुगादे, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगितली. श्रीकांत पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी बोलतांना आयुक्त कवडे पुढे म्हणाले की, बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांना बँकेकडून मदतीचा हात मिळायला हवा त्यादृष्टीने व्यवस्थापन नियोजन असावे. वेळेवर लेखा परीक्षण करणे, कामकाजाची शिस्त, कर्जाची नियमितता, त्याची योग्य प्रकारे वसुली याकडे बँकेच्या व्यवस्थापनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बँक कर्मचारी, अधिकारी, सदस्यांच्या बरोबरीने कर्जदार आणि ठेवीदार यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मनुष्यबळ हा महत्वाचा विषय आहे. ते अभ्यासपूर्ण पारदर्शक असायला हवे. त्यामुळे उत्पादकता वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलतांना सतीश मराठे म्हणाले की, नागरी सहकारी बँकांसमोर असणार्या विविध प्रश्नांंचा अभ्यास राज्य बँक फेडरेशन आणि बँक असोसिएशन यांनी करावा आणि याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेला पाठवावा. बँकेच्या कामकाजात अधिक प्रमाणात व्यावसायिकता वाढवावी लागेल. आर्थिक क्षेत्रातील घडामोंडीचा परिणाम हा व्यवसायावर होतो आहे. एका बाजूला महागाई वाढली की त्याचा परिणाम हा व्याजदर वाढण्यावर होत असतो त्यामुळे आर्थिक विषयातील घडामोडींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत सातत्याने आढावा घेणे आवश्यक आहे. बदलत्या काळात बँकांसमोरील आव्हानांचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी राष्ट्रीय महामंत्री डॉ. जोशी म्हणाले की, आगामी काळात सहकार क्षेत्राची दशा आणि दिशा बदलणार आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार सहकाराला बळ देण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थव्यवस्था बळकटीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी केल्या आहेत. विकास सोसायट्यांना दर्जा देण्याचे सरकारने मान्य केले आहे, त्याचबरोबर पतसंस्थांना सुद्धा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सहकार चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा याकरिता त्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. ज्या भागामध्ये ज्या स्वरुपाच्या सहकारी संस्था नाहीत तेथे सुरू कराव्यात, त्याचप्रमाणे समाजातील सहकाराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलतांना अॅड. मोहिते म्हणाले की, सहकारात राजकारण असू नये तरच सहकाराचा विकास अधिक गतीने होणार आहे. सद्य स्थितीमध्ये नागरी बँकांसमोर अनेक आव्हाने असून त्यामधून मार्ग काढायला हवा. प्रशिक्षणा बरोबर कौशल्य विकासाला देखील प्राधान्य दिले जावे. यावेळी प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे यांनी प्रास्ताविक केले.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकाचे संचालक, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात वसूली आणि जोखीम व्यवस्थापन, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट इन को-ऑप बँकिंग, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा तरतुदी आणि नियम, त्याचे परिणाम आणि साबर सुरक्षा फ्रेमवर्क आणि अनुपालन या विषयावर अनुक्रमे सर्वश्री अविनाश जोशी, सचिन आंबेकर, वसंतराव गुंड आणि क्षितीज कुलकर्णी, सत्यजित खाडीलकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शरद गांगल यांनी बँकांच्या कामांचे बदलते स्वरूप, व्यवस्थापनाची अपेक्षा, कर्मचार्यांची मानसिकता या विषयावर सविस्तर विवेचन केले.