सुरक्षिततेसाठी मानसिकता निर्माण करण्याची गरज : डॉ. राशिंगकर


सुरक्षिततेसाठी मानसिकता निर्माण करण्याची गरज : डॉ. राशिंगकर
पुणे, दि. ४ मार्च : सुरक्षितता सर्वस्तरावर महत्वाची आहे, मात्र दुर्घटना झाल्यावरच जाग येते, यासाठी आपल्याला मानसिकता निर्माण करण्याची आणि ती रुजवण्याची मोठी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ. सुधीर राशिंगकर यांनी आज येथे केले.
नॅशनल सेफ्टी ऑर्गनायझेशन (NSO) आयोजित ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षितता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पोतनीस होते. डॉ. राशिंगकर पुढे म्हणाले की, सुरक्षितता फक्त कारखान्यांमध्ये महत्वाची नाही तर ती घरात, रस्त्यावर, कार्यालयात सर्वत्र महत्वाची आहे. अनेकदा दुर्घटना या केवळ सुरक्षितता न पाळल्याने घडतात. छोट्या-छोट्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. शालेय जीवनापासून यासाठी नागरिकांमध्ये मानसिकता निर्माण करावी लागेल.
यावेळी एकविरा प्रकाशन प्रकाशित आणि सुहास कुलकर्णी लिखित “औद्योगिक सुरक्षितता” या मराठी पुस्तकाचे तसेच डॉ. अमित पाटील यांच्या “सुरक्षिततेचे मानसशास्त्र” या इंग्रजी भाषेतील ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.
४ मार्च १९६६ रोजी भारतात राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेची स्थापना झाली. त्यामुळे ४ ते ११ मार्च हा सुरक्षितता सप्ताह साजरा केला जातो. १९८७ मध्ये विष्णू फडके यांनी NSO ची पुण्यात स्थापन केली. प्राचार्य संजय काळे यांनी संस्थेची माहिती दिली तर यावेळी सुरक्षितता पदविका प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.