ज्येष्ठ पत्रकार विष्णू विश्वनाथ करमरकर यांचे निधन…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर यांचे आज सकाळी मुंबईतील अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक नंतर मुंबईतील दैनिक लोकमित्रमधून केली होती.
मराठी दैनिकांमध्ये सर्वप्रथम क्रीडा पान सुरु करणारे म्हणून करमरकर यांची ख्याती होती. अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये 10.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले होते, तर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले होते.
१९६२मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन आदींनी मराठी वाचक जोडला जाऊ लागला. यामुळे हळूहळू सर्वच दैनिकांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.१९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बांधकामात सुमारे १०० मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’ मधून मांडली होती.
त्यांनी सुरेश कलमाडी यांच्यावर देखील टीका केली होती. क्रीडा संकुलांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांना वाचा फोडली होती. करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.