पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वर्ष 2023-24 साठीचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प सादर

पिंपरी ( परिवर्तनाच सामना ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात शहरी नियोजनात आघाडीवर आहे. परंतु भविष्यातील एक आदर्श शहर बनण्यासाठी पायाभूत सुविधेबरोबरच शहराची सांस्कृतिक व सामाजिक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. शहरी विकासाच्या संकल्पना राबविताना नागरिक हा केंद्रबिंदू मानून समतोल विचार होणे आवश्यक आहे. जेणेकरून संपूर्ण समाजाला फायदा होईल, असे विचार महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मांडले
.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा ७ हजार १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त शेखर सिंह यांनी आज मंगळवारी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहाच्या पटलावर मांडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, अतिरिक्त आयुक्त – १ प्रदीप जांभळे पाटील आदी उपस्थित होते.आयुक्त शेखर सिंह पुढे बोलताना म्हणाले, आज शहरातील नागरिकांना जगातील चांगल्या सोयी सुविधा महानगरपालिकेकडून मिळण्याची अपेक्षा आहे. महानगरपालिकेसाठी हे केवळ चालू पिढीसाठी नव्हे तर भविष्यातील, शहरातील रहिवाशांच्या दृष्टीने देखील आव्हान आहे
. तसेच शहरातील विविध सामाजिक आर्थिक घटकांच्या गरजा आणि आकांक्षा यांचा समतोल साधण्याचे आव्हान ही महानगरपालिके समोर आहे.भविष्यातील आदर्श शहर बनविण्यासाठी महानगरपालिकेने साधन संपन्न, सुलभ व सुरक्षित असावे लागेल. या तत्त्वांचा पाया म्हणून विचार करताना महानगरपालिकेस आरोग्यदायी पर्यावरण पूरक, आणि शाश्वत अशा संकल्पनाचा सर्वसमावेशक म्हणून विचार करणे आवश्यक आहे.
वरील संकल्पना या २०३० पर्यंत भारतातील सर्वात सर्वसमावेशक आणि राहण्यास सक्षम शहर बनवणे या दृष्टिकोनासह बनवण्यात आल्या आहेत. महानगरपालिका वरील सर्व बाबी साध्य करण्यासाठी एकात्मिक योजनेद्वारे कटीबद्ध आहे. त्यासाठी महापालिका शाश्वत, गतिशीलता, पर्यावरण पूरक राहणीमान, क्रीडा पर्यटन आणि सांस्कृतिक तसेच कायदा आणि शासन व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान व आर्थिक विकास या घटकांवर काम करेल.
एकात्मिक विकास या संकल्पने नूसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करुन रस्ते पुल याबरोबरच रुग्णालये, क्रीडांगणे, शाळा अशा बाबींच्या निर्मितीवर भर देवून शहर हे सुलभ दळणवळण, आधुनिक वैद्यकीय सेवा व शैक्षणिक गुणवत्ता वाढून वेगवेगळ्या खेळांना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्या योग्य बनवून शहरातील सर्व घटकाना या सुविधा सहज उपलब्ध करुन देण्याचा माझा मानस आहे. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणे शक्य आहे.