संस्कृत संशोधनासाठी भांडारकर संस्थेचा भव्य प्रकल्प


*संस्कृत संशोधनासाठी भांडारकर संस्थेचा भव्य प्रकल्प*
पुणे, दि. 23 मार्च – संस्कृत भाषेच्या संशोधन, संवर्धनासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने प्रशस्त भवन उभे राहणार असून यासाठी भरघोस निधी श्री मुकुंद भवन ट्रस्टने आज संस्थेला प्रदान केला. या ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया यांनी निधीचा धनादेश भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांच्याकडे आज सुपूर्द केला
. यावेळी श्री मुकुंद भवन ट्रस्टचे आदित्य लोहिया, वर्धमान जैन आणि डॉ. शैलेश गुजर तर भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, श्रीनिवास कुलकर्णी व मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन व्यासपीठावर उपस्थित होते. या संस्कृत संशोधन भवनाच्या प्रकल्पाविषयी बोलतांना भूपाल पटवर्धन म्हणाले की, अत्यंत प्रशस्त व सुसज्ज असे सुमारे 16 हजार चौ.फूट बांधकाम क्षेत्र असलेले हे दुमजली भवन संस्थेच्या आवारातच बांधले जाणार आहे
. या भवनामध्ये सर्व स्तरावरील संशोधकांसाठी अत्याधुनिक 4 ते 5 अभ्यासिका, ग्रंथालय, निवासासाठी 20 खोल्या तसेच स्वतंत्र सभागृह असणार आहे. भांडारकर संस्थेत 50 हजारांहून अधिक संस्कृत भाषेतील ग्रंथ, पोथ्या व हस्तलिखिते आहेत. संस्कृत भाषेचे जतन, संवर्धन होण्याबरोबरच त्यावर सखोल संशोधन होण्याची देखील गरज आहे
. आज नवनवीन संशोधक संस्थेत येत आहेत. यामुळे विविध संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये देखील भाषांतर देखील करण्याची योजना आहे. त्यासाठी अशा स्वतंत्र भवनाची आवश्यकता होती.यावेळी प्रदीप रावत म्हणाले की, हा प्रकल्प एकूण 12 कोटींचा असून यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन केले जात आहे.
याचा शुभारंभ श्री मुकुंद भवन ट्रस्टने केल्याचा आनंद आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सरकारच्या नव्हे तर समाजाच्या पाठींब्यावरच हे कार्य यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीनंद बापट यांनी केले.