रांजनगाव येथे इएसआयसी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

रांजनगाव येथे इएसआयसी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 21 मार्च रोजी कामगार राज्य विमा महामंडळ (इएसआयसी), उप प्रादेशिक कार्यालय , बिबवेवाडी व आयटीसी लिमिटेड यांच्या वतीने विमाधारक व्यक्ति व नियोक्त्यांसाठी रांजनगाव येथे जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इएसआयसीची कार्यप्रणाली व इएसआयसी मार्फत दिल्या जाणार्‍या लाभांची माहिती देण्यात आली

.कार्यक्रमाला इएसआयसी उप प्रादेशिक कार्यालय पुण्याचे कार्यालय प्रमुख उप संचालक (प्रभारी) श्री हेमंत कुमार पाण्डेय , उप संचालक सुशीलकुमार श्यामकुंवर आणि आयटीसी लिमिटेडचे महाव्यवस्थापक श्री संदीप शर्मा उपस्थित होते.

कार्यक्रम दोन सत्रांमध्ये संपन्न झाला. पहिले सत्र नियोक्त्यांसाठी आयोजित केले होते, ज्यामध्ये शहराच्या विविध भागांमधून आलेले कंपन्यांचे मानव संसाधन व्यवस्थापक व प्रतिनिधि उपस्थित होते. या सत्रात श्री सुशीलकुमार यांनी उपस्थितांना इएसआयसी अधिनियमाच्या अनुपालनासंबंधी सविस्तर माहिती दिली.

श्री पाण्डेय यांनी इएसआयसीच्या नवीन उपक्रमांसंबंधी मार्गदर्शन केले.दुसरे सत्र विमाधारक व्यक्तींसाठी आयोजित केले होते ज्यामध्ये विविध कंपन्यांचे विमाधारक व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या सत्रात श्री सुशीलकुमार यांनी पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन च्या माध्यमातून इएसआयसी मार्फत दिल्या जाणार्‍या वैद्यकीय लाभ, अपंगत्व लाभ, मातृत्व लाभ, आजारपण लाभ इत्यादि संबंधी सविस्तर माहिती दिली

तसेच हे लाभ प्राप्त करण्यासाठीच्या प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन केले. श्री पाण्डेय यांनी विमाधारक व्यक्तींसाठी इएसआयसी मार्फत सुरु केलेल्या नवीनतम उपक्रमांची माहिती देतानाच कामगारांनी इएसआयसीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री संदीप शर्मा यांनी जागरूकता कार्यक्रमाच्या आयोजनाबद्द्ल इएसआयसीचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन फुलारी यांनी केले.

Latest News