लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान’ या विषयावरील कार्यशाळेला चांगला प्रतिसाद….


विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरीकांचा सहभाग
…………………..
‘लाचखोरीची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी प्रयत्न गरजेचे ‘ : मिलिंद गायकवाड
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या वतीने ‘ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचारनिर्मुलन आणि भारतीय संविधान’ या विषयावर विद्यार्थी, कार्यकर्ते आणि नागरीकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गांधी भवन मिनीथिएटर ( एसी हॉल) कोथरूड, पुणे येथे रविवार, २८ मे २०२३ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत ही कार्यशाळा पार पडली. माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर , सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मिलींद गायकवाड यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले . संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मनिष देशपांडे ,सुदर्शन चखाले ,नीलम पंडीत , प्रसाद झावरे – पाटील आदी उपस्थित होते.
दीनानाथ काटकर म्हणाले, ‘ लाचलुचपत, भ्रष्टाचार प्रतिबंध हा किचकट विषय आहे.संविधानाने जनतेला देशाचे मालक केले आहे. त्यांच्या कामांसाठी लोकसेवक, लोकप्रतिनिधी नेमले आहेत.कमिशन घेऊन काम करणारे , सेवा देणारेही लोकसेवक मानले गेले आहेत. स्टँप विक्रेते, ई -सेवा केंद्र त्यात येते.आपण विविध माध्यमातून कर भरून जो निधी तयार होतो, सरकार त्यातूनच खर्च करीत असल्याने सरकारीसरकारी कामांसाठी लाच मागीतली तर आपण कारवाईचा मार्ग स्वीकारला पाहिजे.फक्त पैसेच नव्हे, तर वस्तू घेणे, ही देखील लाच मानली जाते. लाचखोरांविरुद्ध लाचलुचपतत खात्याच्या टोल फ्री नंबरवर तक्रार देता येते. त्यांनीही त्यांच्या वेबसाईटवर मराठी भाषेत माहिती देणे गरजेचे आहे ‘.
‘माहिती आधिकार कार्यकर्त्यावर ३५३, ३८५ कलम, अॅट्रोसिटीसारखे गुन्हे दाखल करुन रोखण्याचे प्रयत्न होतात. पण, धीर सोडू नये. देश भ्रष्टाचारमुक्त करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात पकडण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, हे सजग नागरिकाचे कर्तव्य आहे ‘, असेही असेही काटकर यांनी सांगीतले.
मिलिंद गायकवाड म्हणाले, ‘ लोकसेवक, लोकप्रतिनिधी यांना आपण राजे करून टाकले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मदतीने आपण अंकुश आणला पाहिजे. व्यवस्थेतून भ्रष्टाचाराची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. पोलिस कर्मचाऱ्यांनी आमिषाला बळी पडता कामा नये. प्रामाणिक व्यक्तींमुळे अजूनही आशा टिकून आहे. संविधान आणि कायद्यांची जाणीव असणं आणि त्याचा प्रसार करणं महत्वाचे आहे.