मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या आशा पल्लवीतमुख्यमंत्र्यांनी नेमली समिती

मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या आशा पल्लवीतमुख्यमंत्र्यांनी नेमली समिती

पुणे, प्रतिनिधी : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, यासाठी छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग, अप्पर मुख्य सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, सचिव सामाजिक व विशेष सहाय्य विभाग, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी जालना, जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हाधिकारी लातूर, सहसचिव महसूल विभाग सदस्य सचिव अशाप्रकारे ही समिती नेमण्यात आली आहे.

मराठवाडा मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी आयोजित परिषदेला छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांच्यासह अनेक जिल्ह्यांचे प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

या संदर्भात बोलताना किशोर चव्हाण व मराठा संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की शासनाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठा समाजाला कसे आरक्षण मिळू शकते, यासाठी जनजागृती दौरा सुरू करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील आरक्षण जनजागृती दौरा व मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा मराठा संघटना सर्व क्षेत्रातील मराठा समाजाची व्यापक बैठक घेऊन जनजागृती करणार आहे.

Latest News