औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नाव करणं शरद पवारांना मान्य नाही…. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात परिवर्तन झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेवून आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालणारं सरकार महाराष्ट्रात आलं. सरकार आल्यानंतर वेगाने कामं सुरु केली. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे औरंगाबादचं नामांतर आपण छत्रपती संभाजीनगर हे केलं असं मतही फडणवीसांनी व्यक्त केलं.मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्ती देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आम्हाला इथे परिवर्तन घडवायचं आहे. मला विश्वास आहे की, हे परिवर्तन आपण करुन दाखवू. मोदींच्या बरोबर डबल इंजिन सरकार आहे. एकमेकांना सोबत घेऊन चालणारं डबल इंजिन महाराष्ट्रालाही पुढे घेऊन जातील असाही विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी औरंगाबादच्या नामांतर छत्रपती संभाजीनगर’ करणं पवारांना मान्य नाही असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर येथे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नाव करणं शरद पवारांना मान्य नाही. ते म्हणाले, तुम्ही नाव काहीही करा, मी औरंगाबादच म्हणणार आहे. पवारसाहेब, तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलंत तरीही छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरु शकत नाही असंही फडणवीस म्हणालेयावेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वात भारतात लोकशाही जिवंत आहेच आणि ती समृद्ध होत आहे असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही सांगितलं असल्याचा पुनरुच्चार देखील केला आहे. मोदींचे सगळे विरोधक पाटण्याला एकत्र आले होते. पण मला सांगा यांच्याकडे एक नेता आहे का? जो मोदींच्या तोडीचा आहे? तुम्हाला सहा महिने राज्य देतो, तुम्ही एक नेता ठरवून दाखवा असं आव्हानही फडणवीस यांनी दिलं. या देशात एकच नेता आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी असंही फडणवीस यांनी म्हटलं आहेआमदार प्रशांत बंब हे एका योजनेचा पाठपुरावा करत होते. जी योजना गंगापूरचं चित्र बदलू शकते. ती म्हणजे गंगापूर सिंचन उपसा योजना. ३० हजार एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. १०० टक्के पाईप आणि ड्रीपने इथल्या शेतकऱ्यांचं भाग्य बदलणार आहे. आम्ही या योजनेला कॅबिनेमटमध्ये मान्यता दिली.