पिंपरी महापालिकेत एसीबीचे ट्रॅप आणि त्यातून कर्मचाऱ्यांचे निलंबन वाढले…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
प्रशासकीय राजवट आल्यानंतर पिंपरी महापालिकेत एसीबीचे ट्रॅप आणि त्यातून कर्मचाऱ्यांचे निलंबन वाढले आहे. गेल्या चार महिन्यात पिंपरी महापालिकेत एसीबीचे तीन ट्रॅप झाले आहेत. त्यातून प्रशासक शेखरसिंह यांचा आपले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता पालिकेकडूनही गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. २३ आणि २४ जुलै रोजी दोन एफआयआर आणि एक एनसी पालिकेने दिलीफसवणुक तसेच लाचखोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाच कर्मचारी गेल्या चार महिन्यात निलंबित झाले आहेत. तर, आता पालिकेनेही दोन दिवसांत तीन गुन्हे पोलिसांत दाखल केले आहेत. त्यामुळे पिंपरी पालिकेत प्रशासकीय राजवटीत चाललंय काय, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.त्यातील पहिला एफआयआर हा पवना नदीत राडारोडा टाकल्याबद्दल सांगवी, तर दुसरा हा लॉंड्रींचे पाणी विनाप्रक्रिया सोडून ही नदी प्रदूषित केल्याबद्दलचा चिंचवड ठाण्यावतील आहे. तर, एनसी ही पालिकेच्या चिखली करसंकलन कार्यालयातील सीसीटीव्हीच्या वायरी तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल चिखली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.एनसीचे प्रकरण गंभीर आहे. त्यात महापालिका व त्यातही करसंकलन विभाग हा आपली झालेली बेअब्रू वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. चिखली करसंकलन कार्यालयातील सीसीटीव्ही बंद करून तेथे आखाड पार्ट्या रंगत होत्या, असे कळते. त्यासाठी तेथील स्मार्ट सिटीच्या ‘सर्व्हर रुम’मधील केबल काढून टाकली जात होतीपण, त्यामुळे चिखली परिसरातील सिग्नल यंत्रणाही ठप्प होत होती. हा प्रकार वारंवार घडू लागल्याने स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सखोल तपास केला असता त्यांना चिखली करसंकलन कार्यालयातील कंत्राटी सुरक्षारक्षक दयानंद उद्धव शिंदे (वय ४०,रा. चिखली) हा या वायरी काढून टाकत असल्याचे समजले. त्यांनी त्याचे सीसीटीव्ही फूटेज पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना दिले. त्यांच्या आदेशाने करसंकलन विभगाचे मंडलाधिकारी राजेंद्र कुंभार यांनी पोलिसांत तक्रार दिली.
मात्र, त्यांनी एफआयआर न घेता फक्त एनसी घेतली. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य कमी झाले आहे. एनसी असल्याने त्यात आरोपीला अटक करण्यासारखी कारवाई पोलिसांना करता येणार नाही. सीसीटीव्हीच्या वायर तोडून करसंकलन कार्यालयाचे नुकसान केले एवढेच तक्रारीत म्हटले आहे.मात्र, त्या कशासाठी काढल्या वा तोडल्या गेल्या, कुणाच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षक हे करीत होता, कशासाठी ते केले जात होते, याबाबत करसंकलन विभाग चुप्पी साधून आहे. कारण त्यात त्यांच्याच चिखली कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी असण्याची भीती त्यांना सतावते आहे. ते सामील असलेली आखाडची ओली पार्टी चिखली कार्यालयात या वायर काढल्यानंतर रंगल्याची खात्रीशीर माहिती आहे.