लोकप्रिय अभिनेत्री सीमा देव यांचं आज वयाच्या 81 व्या वर्षी निधन…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच मोठ्या कालावधीपासून अल्झायमरने ग्रस्त होत्या.सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत. २०१३ साली त्यांनी त्यांच्या लग्नाची पन्नाशी साजरी केली होती.१९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सीमा देव या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ होत. बालपण मुंबईतच गेलेल्या नलिनी सराफ यांना नृत्याची विशेष आवड होती. वडिलांचे छत्र हरवल्याने आईला मदत म्हणून आणि भावंडांचे संगोपन व्हावे म्हणून त्यांनी चित्रपटातून नृत्य सादर करण्यास सुरुवात केली होती. आलिया भोगासी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटातून त्या रमेश देव यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर पडछाया चित्रपटात त्या रमेश देव यांच्यासोबत मुलीच्या भूमिकेत दिसल्या. ग्यानबा तुकाराम या चित्रपटात दोघेही पुन्हा एकत्र झळकले होते.यंदा कर्तव्य आहे,माझी आई, सुवासिनी, मोलकरीण, पाहू रे किती वाट अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. सालस, सोशिक अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. जगाच्या पाठीवर चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या. आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रासलेल्या होत्या. रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या. रमेश देव यांचे निधन झाले हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना सुनानाही त्या ओळखत नसत. त्यामुळे अशा दिवसांत मुलगा अजिंक्य देव आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे. रमेश देव आणि सीमा देव यांचा प्रेमविवाह होता. कोल्हापूर मध्ये या दोघांच्या लग्नाला खूप गर्दी जमली होती त्यामुळे त्यांचे हे लग्न सर्वार्थाने गाजले होते. रमेश देव यांचे सीमा देव यांच्यावर निस्सीम प्रेम होते. प्रत्येक वाढदिवसाला ते सीमा देव यांना मौल्यवान भेट वस्तू देत असत.एकदा ही भेटवस्तू घेण्यास सीमा देव यांनी नकार दिला होता त्यावेळी रमेश देव म्हणाले होते की, ‘ही भेटवस्तू राहूदे, काय माहीत मी उद्या असेन किंवा नसेन’ हे ऐकताच सीमा देव यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले होते. रमेश देव आपल्या अखेरच्या दिवसातही खूप उत्साही होते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण साजरा केला पाहिजे हे त्यांचे मत होते. सिमा देव अल्झायमर आजारामुळे आपल्याला ओळखत नाही ही खंत त्यांच्या मनात सलत राहिली होती. आज सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने अशा आठवणी रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहून जातील यात शंका नाही.२०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.