जालियानवाला बाग ते जालना..

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

भाजप सत्तेत असताना मागे वारकऱ्यांवर आणि काल आंदोलकांवर लाठी चार्ज झाला. भारतीयांना लाठी हल्ला तसा नवीन नाही.अगदी इंग्रजांच्या राजवटीपासून आपण हे पाहत आलो आहोत. १७५७ च्या प्लासीच्या लढाईवेळी इंग्रजांनी मीर जाफरला लाच दिली आणि इंग्रजांनी भारतात प्रवेश केला. पुढे जाती जाती आणि धर्माधर्मात भांडणे लावून सत्तेत राहून आपल्या काठीला धार लावत बसले. भारत पारतंत्र्यात गेला पण आपल्याकडे सत्याग्रह हे एक हत्यार होते. गुलामगिरीतून मुक्तता मिळावी म्हणून शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन म्हणजेच सत्याग्रह होय. पण रयतेचे स्वराज्य इंग्रजांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळेच रौलेक्ट कायद्याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर बेछूट गोळीबार या इंग्रजी विचारांनी केला आणि इंग्रजांचे खरे रूप जालियनवाला बाग हत्याकांडातून सर्व भारतीयांसमोर पुन्हा एकदा आले. काल जालन्यात तेच झाले. आम्ही सांगतो फक्त तेच करा मग लाठ्या मारणे असो किव्वा सरकार पाडणे असो.आंदोलन करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा या सरकारला द्यायचे नाही, आरक्षण तर सोडाच.आज भाजपाकडे ईडी आणि आयटी यासारख्या बंदुकी, लाच आणि लाठ्या आल्या आहेत. त्याचा वापर करून आज केंद्रातले हे भाजप सरकार मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदे देतंय आणि भ्रष्टाचाराची एक एक लाठी लोकशाहीच्या पृष्ठभागावर मारत आहे. अगदी मीर जाफरला लाच दिली तशी. आज मणिपूर धगधगत आहे. पण इथे स्थानिक अस्मिता सुद्धा महत्वाची आहे हेच भाजप विसरत चालले आहे. त्यांना राष्ट्र प्रथम हेच महत्वाचे वाटत आहे. आज, या अस्मितेवर प्रेम म्हणजे भारतावर प्रेम होय हे सांगण्याची गरज आहे. आमचं आंदोलन आणि आमच्या मागण्या म्हणजेच भारतावर प्रेम आहे हे भाजपाला समजायला हवे. असो,कालचा जालन्यातील भाजप सरकारचा आंदोलकांवर केलेला लाठी हल्ला पाहून कोणालाही वाटेल कि भाजपचे हे सरकार तर ‘ इंग्रज रिटर्न्स’ सरकार आहे ज्यांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता नको आहे. अजूनही लोकशाहीच्या लोकांचा “जालियानवाला बाग ते जालना ” असा प्रवास सुरु आहे. भाजपाला संविधान नको आहे पण याचे उत्तर संविधान हेच आहे.

Latest News