BJP अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणपतीच्या आरतीसाठी आले असताना मंडळाच्या मांडवात आग लागल्याची घटना समोर


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं मंडळ आहे. यंदा या मंडळानं उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते इथल्या गणेशाच्या आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक मंगळवारी संध्याकाळी हा आगीचा प्रकार घडला. पुढील गोंधळ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावं लागलं. पुण्यातील अंबिलओढा कॉलनी परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणेश देखाव्याच्या कळसाला आग लागल्याचं वृत्त आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरु असताना हा प्रकार घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.पाऊस सुरू झाल्यामुळं आग काही मिनिटांत विझली. मात्र, ती नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक वाॅटर टँकर ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत देखाव्याचं नुकसानं झालं पण कुणीही जखमी झालेलं नाही.