विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ‘चा ‘नॉर्थ ईस्ट कॉलिंग प्रोग्रॅम ‘ उत्साहात ‘बालशिक्षण,ग्रामविकासात योगदान महत्वाचे’ :डॉ.गणेश नटराजन

viveka



पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

‘लहान मुलांचे शिक्षण,ग्राम विकास हा महत्वपूर्ण विषय असून त्यात आणखी योगदान देण्याची गरज आहे.राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने विशाल आणि व्यापक सामाजिक ध्येय समोर ठेवले पाहिजे’,असे उद्गार डॉ गणेश नटराजन यांनी काढले.

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ तर्फे २ ऑक्टोबर रोजी पुण्यात ‘नॉर्थ ईस्ट कॉलिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नॅसकॉमचे माजी अध्यक्ष डॉ.गणेश नटराजन हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.’इग्नाईटिंग यंग माईंड्स फॉर नेशन बिल्डिंग’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी ‘नेशन बिल्डिंग वर्क ऑफ विवेकानंद केंद्र विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ ईस्ट’ या विषयावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम २ ऑकटोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स.प.महाविद्यालयाचा लेडी रमाबाई हॉल येथे झाला. ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’ चे महाराष्ट्र प्रांत प्रमुख किरण कीर्तने ,खजिनदार प्रवीण दाभोळकर हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.

डॉ.गणेश नटराजन म्हणाले,’निस्वार्थ ध्येय आणि सर्व मानवी कल्याणासाठीचे उद्दीष्ट असेल तर ते कार्य सफल होतेच,असे महात्मा गांधी यांनी सांगितले.ते आपण लक्षात ठेवले पाहिजे.राष्ट्रनिर्मीतीच्या दृष्टीने विशाल आणि व्यापक सामाजिक ध्येय समोर तर अनेक उद्योजक आर्थिक मदतीस पुढे येतात.अनेक उद्योजक सामाजिक कार्यास मदत करण्यास उत्सुक असतात,मात्र चांगले सेवाकार्य असले,हेतू चांगला असला तर ते पुढे येतात.

‘लहान मुलांचे शिक्षण,ग्राम विकास हा महत्वपूर्ण विषय असून त्यात आणखी योगदान देण्याची गरज आहे. आम्ही गरीब मुलांच्या शैक्षणिक कार्यात सरकारचे पैसे घेत नाही आणि सरकारला पैसे देतही नाही.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सुमारे २३ लाईट हाऊस आणि स्कील सेंटर तयार केले आहेत, ज्यात गरीब गरजू विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या इच्छेनुसार विविध क्षेत्रातील कौशल्ये शिकवतो, आणि त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करतो’.

निवेदिता भिडे म्हणाल्या,’स्वामी विवेकानंद यांनी देशाला स्वत्व आणि स्वाभिमान देण्याचे कार्य केले.राष्ट्रनिर्माण कार्याच्या दृष्टीने शाश्वत विकास करायचा असेल तर तो आपली संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या आधारेच खरा विकास होऊ शकतो.ईशान्येकडील राज्यांमध्ये,जनजातींमध्ये मध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे.येथील भाषा,वर्ण,प्रथा,देवदेवतांची नावे,सणही वेगळे आहेत. त्यामुळे इथे शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि इतर विकास कामे करणे खूपच मोठे आव्हान होते.अरुणाचल मध्ये त्या काळी संपर्क साधने,रस्ते,दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या.त्यामुळे आम्ही निवासी शाळा सुरू केल्या.पूर्वी या शाळेत शेजारच्या गावातील विद्यार्थ्यांना सात दिवस चालत आल्यावर इथे पोचता येत असे,आता मात्र परिस्थिती बदलली आहे.येथील विद्यार्थी अगदी जगभर आपल्या ज्ञानाचा आधारे प्रगती करीत आहेत’.

विवेकानंद केंद्र अरुणाचल येथील विशाल दत्ता आणि ईतेमसो मालो या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण दाभोलकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अपर्णा लळींगकर यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण किर्तने यांनी केले.प्रा.अनिरुद्ध देशपांडे,प्रकाश पाठक,.श्री.पोळेकर ,श्री.काकतकर, स्वरूप वर्धिनीचे शिरीष पटवर्धन,जयंत कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

Latest News