‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ आली पुस्तकरूपात!

Untitled-1-1


…………….
८ ऑक्टोबर रोजी अरविंद गुप्ता यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

ग्रामीण विकासासाठी शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेल्या पाबळ, जि पुणे येथील विज्ञानाश्रम चा प्रवास पुस्तकरूपात येत आहे.हा प्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

विज्ञानाश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी लिखित हे पुस्तक समकालीन प्रकाशन तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन कार्यक्रमाला ज्येष्ठ संशोधक डॉ .अरविंद गुप्ता हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. आनंद अडसूळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जे.पी नाईक सेंटर फॉर एज्युकेशन , एकलव्य पॉलिटेक्निक च्या मागे कोथरूड डेपो, पुणे येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत होणार आहे.

विज्ञानाश्रम स्थापनेला ४० वर्ष झाल्याने त्याबाबतची माहिती, प्रेरणा आणि योगदान सर्वांपर्यंत जावे, या हेतूने हे पुस्तक लिहिल्याची माहिती डॉ.योगेश कुलकर्णी यांनी दिली.

विज्ञानाश्रमाविषयी :

डॉ श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ साली भारतीय शिक्षण संस्थेचे केंद्र म्हणून पाबळ येथे विज्ञान आश्रमाची स्थापना केली. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. सध्या डॉ.योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रमचे कार्यकारी संचालक आहेत.

शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास या संकल्पनेवर विज्ञान आश्रम काम करत आहे. ग्रामीण युवकांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांना त्यांचे उद्योग सुरू करून देणे हे विज्ञाना आश्रमाचे काम आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन त्यासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम विज्ञान आश्रम करतो. पाबळ येथे डोम आकाराची घरे, विविध शेतकी अवजारे, शेती आणि पशुपालनातील आधुनिक तंत्रे खाद्य निर्मितीतील विविध व्यवसाय संधी इलेक्ट्रॉनिक्स फॅब्रिकेशन अशा विविध विषयांमध्ये विज्ञान आश्रम युवकांना प्रशिक्षण देतो.

विज्ञान आश्रमाच्या शैक्षणिक संकल्पनेचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत होण्यासाठी माध्यमिक शाळांसाठी ‘मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे. इयत्ता इयत्ता आठवी ते दहावी मधील शाळांमध्ये हा कार्यकेंद्रि अभ्यासक्रम राबवला जातो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावी ते आठवीसाठी व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख हा अभ्यासक्रम विज्ञान आश्रमाने तयार केला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या इंटर्नशिप आणि फेलोशिप विज्ञान आश्रम तर्फे दिल्या जातात. त्यामध्ये समाजातील तांत्रिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करून अनेक समाज उपयोगी तंत्रज्ञान विज्ञान आश्रमाने विकसित केले आहे.

अंडी उबवणी यंत्र, सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, हातसडीचा भात तयार करणारे मशीन, ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कंपोस्टर आदी अनेक तंत्रज्ञाने विज्ञान आश्रमाने विकसित केली आहेत व त्यावर आधारित व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे.

Latest News