पुण्यात मनसेने केलेल्या खळखट्याक आंदोलन प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुण्यात मनसेने केलेल्या खळखट्याक आंदोलन प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजेंद्र वागस्कर यांच्यासह २० ते २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रामबाग आणि डेक्कन पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.या कारवाईमुळे मनसे कार्यकर्ते आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विविध शहरात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मुदत उलटून गेल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने बुधवार २९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात परिपत्रक काढले होते.राज्य सरकारच्या आदेशानंतरही दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास विलंब करणाऱ्या दुकानदारांना मनसेने शुक्रवारी चांगलाच इंगा दाखवला. पुण्यात मराठी पाट्या न लावलेल्या दुकानांची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिस आणि मनसैनिकांमध्ये झटापट देखील झाली. दरम्यान, दुकानांची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत, मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे. जे व्यावसायिक मराठीमध्ये पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे आदेश आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले.दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी याबाबत मनसेकडून पुणे महानगरपालिकेला पत्र देण्यात आले होते. तसेच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी शहरात जंगली महाराज रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत दुकानांची तोडफोड केली.