कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या’ या विषयावरील परिसंवादाला प्रतिसाद…..कीर्तन हा महाराष्ट्राच्या भाव जीवनाचा गाभा : परिसंवादातील सूर


‘कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या’ या विषयावरील परिसंवादाला प्रतिसाद……………..कीर्तन हा महाराष्ट्राच्या भाव जीवनाचा गाभा : परिसंवादातील सूर
पुणे : भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित , आणि आठवडाभर चाललेल्या ‘कथा कीर्तन महोत्सव’ चा समारोपा निमीत्त रविवार,दि. ३ डिसेंबर रोजी ‘कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला
. ‘कीर्तन हा महाराष्ट्राच्या भाव जीवनाचा गाभा असून नवी कौशल्ये आत्मसात करीत ,ही परंपरा पुढे जावी ‘, असा सूर या परिसंवादात उमटला.या परिसंवादामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माध्यमतज्ज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. प्रणव गोखले सहभागी झाले .ह .भ. प. प्रा. अभय टिळक यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले
. इन्फोसिस चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी यांनी सर्व वक्त्यांचा सत्कार केला. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.सकाळी १० ते १२ दरम्यान भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये हा परिसंवाद रंगला.प्रा. अभय टिळक म्हणाले,’ आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा संगम भारतीय विद्या भवन च्या कार्यात झाला आहे.
वारकरी प्रवाह हा महाराष्ट्राच्या भाव जीवनातील गाभा आहे. त्याने सर्वांचा परिपोष केला आहे. हे कार्य मोलाचे आहे. डॉ सदानंद मोरे म्हणाले,’वारकरी परंपरा हा समाज जीवनाचा महत्वाचा भाग आहे .
कीर्तनात नवा प्रवाह आणण्याचे काम प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज तसेच राष्ट्रीय कीर्तनाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी केले अध्यात्मातील कीर्तन लौकिक जगात आणण्याचे काम पुढे झाले. ते समकालीन जीवनाशी जोडले गेले. ‘तमाशाच्या आत किर्तन असले तर चालेल,
पण कीर्तनाच्या आत तमाशा असता कामा नये. त्यामुळे केवळ रील तयार करण्यासाठी कीर्तन वापरू नये ‘, असे परखड मतही डॉ.मोरे यांनी व्यक्त केले.प्रणव गोखले म्हणाले, ‘ चांगल्या विधायक गोष्टी कीर्तनातून पुढे आल्या पाहिजेत. तसेच मागे वळून पाहिले पाहिजे .कथेमध्ये सर्वसामान्यांना रस असतो.
त्यात सवंगपणा येता कामा नये. आख्यानात ते तत्व पाळले गेले आहे. हा प्रवाह अव्याहत रहावा त्यातील भेद नाहीसे व्हावेत. ‘प्रा .विश्राम ढोले म्हणाले, ‘संज्ञापनात प्रेषक आणि प्रेक्षक ( श्रोते ) महत्वाचे असतात. कथा कीर्तनातून काय कथानक ( कंटेंट ) दिला जात आहे, हेही महत्वपूर्ण आहे ‘.’
आधुनिक साधने हाती नसताना कीर्तन संवाद परंपरा प्रभावीपणे टिकून राहिली, हे या माध्यमाचे वैशिष्ट्य आहे, प्रबोधनाचा उद्देश साध्य झाला असली तरी कला आणि कौशल्ये याकडे अजून लक्ष द्यायला हवे ‘,असेही प्रा ढोले यांनी सांगीतले.
याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप निमीत्त सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे ‘महाभारतातील किर्तन परंपरा ‘ यावर व्याख्यान झाले .त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर झाले.