गांधी दर्शन शिबीराला चांगला प्रतिसाद वैचारिक हिंसेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे: तुषार गांधी


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिराला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी( गांधी समजून घेताना ),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रहशास्त्र ), प्रा.एस. इरफान हबीब( विचार आणि वारसा) या मान्यवरानी मार्गदर्शन केले.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे आठवे शिबीर होते.
रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबीर झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, प्रा.एम. एस. जाधव यांनी तुषार गांधी यांचा सत्कार केला. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. डॉ.उर्मिला सप्तर्षी,डॉ प्रवीण सप्तर्षी, ज्ञानेश्वर मोळक,सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) ,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) ,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) , रोहन गायकवाड, नीलम पंडित, प्रसाद झावरे उपस्थित होते.
तुषार गांधी म्हणाले,’ गांधी विचाराचे विरोधक आज बलवान झाले आहेत आणि अपप्रचार करीत आहेत. आपली शक्ती कमी वाटली तरी आपण पूर्ण क्षमतेने गांधी विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.वैचारिक हिंसेच्या विरोधात आपण उभे राहिले पाहिजे कारण या वैचारिक हिंसेचा प्रवास प्रत्यक्ष हिंसेपर्यंत होतो.गांधीजी यांच्या बाबतीत महानपणावर बोलणारे खूप आहेत, ते इतरांप्रमाणेच सामान्य व्यक्ती होते. त्यांच्यातील साधारण व्यक्तीला आपण समजून घेतले तरच आपण त्यांच्यासारखे होवू शकतो’.
‘लहानपणी, युवा अवस्थेत गांधीजी घाबरट होते. कोणतेही लौकिक यश त्यांना मिळाले नव्हते.पूर्ण आयुष्य त्यांनी स्वतःच्या उणीवा आणि कमकुवतपणाचा शोध घेतला आणि त्यावर मात केली. आपण देखील आपल्या उणिवांकडे दुर्लक्ष करता कामा नये.सविनय कायदेभंग सारख्या गोष्टी त्यांनी रोजच्या अनुभवातून शिकल्या. महात्मा गांधी यांचा अभ्यास हा त्यांच्या साधारण व्यक्ती असण्याचा अभ्यास आहे.आपण मोहनदास या साधारण व्यक्तीचा अभ्यास करीत नाही, त्यामुळे महात्मा गांधी या व्यक्तीवर होणाऱ्या वैचारिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देवू शकत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील मतभेद विनाकारण फुगवून सांगितले जात आहेत. सर्व महान व्यक्तींनी दलितांचे शोषण केले तसे आणखी एखाद्या महात्म्याकडून होवू नये, म्हणून डॉ.आंबेडकर हे दैवतीकरणाच्या विरोधात होते’,असेही त्यांनी सांगीतले.