‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त) लिखित ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवार,दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र,भारतीय विद्या भवन जवळ,सेनापती बापट रस्ता येथे झाले.भारतीय विद्या भवन आणि इंडस सोर्स बुक्स यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे आणि ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवासराव सोहोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण,नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्यावर हे पुस्तक आधारित आहे.

भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे ,इंडस सोर्स बुक्स च्या संचालक सोनावी देसाई,जनरल कुलकर्णी, जनरल अशोक जोशी, अजित आपटे आदि मान्यवर उपस्थित होते.नंदकुमार काकिर्डे यांनी आभार मानले.

डॉ.कर्नल अनिल आठल्ये(निवृत्त)हे निवृत्त लष्करी अधिकारी असून संरक्षण मंत्रालयाच्या युद्ध अध्ययन विभागाचे माजी प्रमुख आहेत.

‘युद्ध कौशल्यांच्या बाबतीत अलेक्झांडरला ‘ अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणतात ,तशीच महान कौशल्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याने हे पुस्तक लिहिले आहे’,असे डॉ.अनिल आठल्ये यांनी सांगितले.

डॉ अनिल आठल्ये म्हणाले, ‘जगभरच्या युद्ध नीतीचा अभ्यास करताना असे जाणवले की छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती, गनिमी कावा जगभर माहिती नाही.ती माहिती करुन देण्याची गरज आहे. त्यामध्ये आपण कमी पडलो. शिवाजी महाराज दहा वर्ष आणखी जगले असते तर आपले नौदल जगात सर्वोत्कृष्ट ठरले असते. मराठा सैन्याची बहादुरी पुढे आली पाहिजे. स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराज यांनी पुढें आणली. त्यापूर्वी स्वराज्य किंवा हिंदवी स्वराज्य हा उच्चार होत नव्हता.

डॉ श्रीनिवास सोहोनी म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर माता जिजाऊ आणि पिता शहाजीराजे यांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रप्रेम, कर्तव्य यांची बीजे त्यांनी रुजवली’.

‘धर्मशास्त्रपासुन युद्धनितीपर्यंत अनेक शास्त्रे त्यांना अवगत होती. गडांच्या नावातून त्याचे सामर्थ्य लक्षात येते, राज्य व्यवहार कोषातून मराठी भाषेचा वापर वाढवणे, या गोष्टी अद्भुत आहेत’, असेही त्यांनी सांगितले .

लीना मेहेंदळे म्हणाल्या,’जगातील इतर राजांचा, देशांचा विचार केला तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लहान भौगोलिक स्वराज्य वाटू शकते, पण इतिहासाला या स्वराज्याने महान तत्वे , धैर्य ,विचार दिले. पिढ्यान् पिढ्या ही मूल्ये पुढे चिरंतन झाली.पुस्तक रूपाने या गोष्टी येत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.


Latest News