मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे -बाबा सिद्दीकी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  मागोमाग एक धक्का बसत आहे. मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ वरिष्ठ नेते बाबा सिद्दकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. 48 वर्षांपासून बाबा सिद्दीकी काँग्रेस पक्षात काम करत होते. मागच्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.आज अखेर सिद्दीकी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी महायुतीत सामील होणार असल्याची माहिती आहे. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहेलोकसभा निवडणूक तोंडावर आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात मुंबईतील दोन बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम येत्या काळातील निवडणुकांमध्ये काँग्रेसवर होणार का? तसंच महायुतीला याचा फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाबा सिद्दीकी यांनी एक ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. मी माझ्या तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो. मागच्या 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मी काँग्रेस का सोडत आहे, याबाबत माझं मत मला व्यक्त करायला खूप आवडलं असतं. पण ते म्हणतात ना की काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. तसंच आहे, या राजीनाम्याबाबत मी फारसं काही बोलणार नाही. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे 14 जानेवारी या दिवशी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला. ट्विट करत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्याचदिवशी दुपारी देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या नाराजीची सर्वत्र चर्चा झाली. आज बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मागच्या महिनाभरात महाराष्ट्र काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले आहेत.

Latest News