भांडारकर संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी अभ्यासक्रमाचा प्रशस्तिपत्र प्रदान सोहळा…


पुणे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी, 12 फेब्रुवारी रोजी पुणे आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक इंद्रजीत बागल यांच्या हस्ते प्रशिस्तपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी आज येथे दिली. सदरचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात होणार असून यावेळी प्रणवतीर्थ चॅरीटेबल ट्रस्टचे सर्वश्री संदीप महाजन, डॉ. योगेश शहा, दीपक मराठे व संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. या अभ्यासक्रमाला प्रणवतीर्थ चॅरीटेबल ट्रस्टने आर्थिक पाठबळ दिले आहे.
लघुसिद्धान्तकौमुदीवर्ग ऑनलाइन पद्धतीने ऑगस्ट 2021 ते ऑगस्ट 2023 या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आला. डिसेंबर 2023 मध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली त्यात सर्व विद्यार्थ्यानी उत्तम यश संपादन केले. या उपक्रमामध्ये भारताबरोबरच मस्कत, कॅनडा या देशातूनही विद्यार्थी सहभागी झाले होते. या पाठ्यक्रमाअंतर्गत लघुसिद्धांतरत्न, कौमुदीरत्न, मनोरमारत्न, शेखररत्न, महाभाष्यरत्न आणि व्याकरणरत्न असे सहा स्तर आहेत. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेतील ग्रंथ उत्तमरीत्या वाचता येतात व त्याचे अर्थ लावता येतात. भांडारकर संस्थेत चालू असलेल्या विविध प्रकारच्या संशोधन कार्यात या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचा संस्थेचा मानस आहे. गतवर्षी लघुसिद्धांतरत्न या एक वर्षीय अभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी द्वैवार्षिकच्या विद्यार्थ्यांना सहाय्यक अध्यापक म्हणून समर्थपणे अध्यापन केले आहे. या अभ्यासक्रमामध्ये आचार्य पांडे यांनी मार्गदर्शन केले.
–