अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा

 पिंपरी, प्रतिनिधी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.      

    संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे, तसेच ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.  

            विद्यार्थ्यांनी ‘ही माय भूमी ही जन्मभूमी आमची’, ‘विठ्ठल आराधना’, जात्यावरील ओवी, कुसुमाग्रज यांची ‘फक्त लढ म्हणा’ कविता सादर करुन वाहवा मिळवली. जय जय महाराष्ट्र माझा व ही माय भूमी ही जन्मभूमी आमची या गाण्यांवर विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य केले. तसेच विद्यार्थीनींनी सादर केलेली मंगळागौरी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली.

याबरोबरच मराठी भाषेची महती सांगणारे नाटक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान व मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. तसेच ‘मोबाईल एक वेड’ ही एकांकिका, मराठी भाषेवर आधारित गीत, श्लोक, नृत्य सादरीकरण करीत सर्वाना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.   

       संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगत आपल्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेत साहित्यनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच मराठी भाषेसाठी संतांनी दिलेल्या योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.    

       मुख्याध्यापिका नीलम पवार, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, प्राचार्या शीतल मोरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील महान ग्रंथ व साहित्यिक यांच्याविषयी माहिती सांगितली. शिक्षिका संजीवनी बडे, शिक्षिका सविता इंगवले यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला.             सूत्रसंचालन विद्यार्थी स्वरूप पवार, प्रज्ञा कोतवाल, शिक्षिका हर्षदा वाजे, बिसमिल्ला मुल्ला यांनी; तर आभार शिक्षिका मंजुषा भाग्यवंत व दीपा गायकवाड यांनी मानले.