अभिनेत्री मानसी नाईकसोबत कार्यक्रमादरम्यान छेडछाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करताना एका व्यक्तीने मानसीसोबत गैरवर्तन केले
‘बघतोय रिक्षावाल…’ या गाण्याने महाराष्टरभर लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी आयोजित कार्यक्रमात सादरीकरणादरम्यान हे कृत्य झाल्याप्रकरणी मानसीने साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यावरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मानसी 5 फेब्रुवारीला पुण्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी गेली होती. पुण्याच्या युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्ताने तिथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना एका व्यक्तीने मानसीबरोबर गैरवर्तन केले. तसेच, मंचाजवळ जाऊन मानसीला धमकावण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप मानसीने लावला आहे. साकीनाका पोलिसांनी तपासासाठी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे दिले आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली.