बाळासाहेब ओव्हाळ तिसऱ्या आघाडी कडून सोमवारी अर्ज भरणार…


पिंपरी, पुणे (दि. २७ ऑक्टोबर २०२४) ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ सोमवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती ओव्हाळ यांनी रविवारी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब ओव्हाळ, गौतम गायकवाड, शिवराज ओव्हाळ, विनोद कांबळे व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय झरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय जाधव व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी बाळासाहेब ओव्हाळ यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. सोमवारी (दि.२८) संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ओव्हाळ तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करणार आहेत.
बाळासाहेब नामदेव ओव्हाळ हे किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ येथून २०१७ मध्ये आरपीआयच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. सकाळी दहा वाजता, आकुर्डी खंडोबा माळ येथून हेडगेवार भवन येथे रॅलीने अर्ज भरण्यासाठी ओव्हाळ जाणार आहेत. तत्पूर्वी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले स्मारक, छत्रपती शाहू महाराज आणि एच. ए. कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ओव्हाळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.