पुण्यातील कोथरूड भागात गुंडाची कोयते आणि तलवारी फिरवत दहशत….


(पुणे;ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुण्यात केळेवाडी या भागातील स्थानिक रहिवाशांचे जनजीवन असुरक्षित झाले आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास काही गुंडांनी परिसरात कोयते आणि तलवारी फिरवत दहशत माजवली
. त्यांनी वाहनांची तोडफोड करून अनियंत्रित हिंसाचार घडवला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, गेल्या चार-पाच वर्षांपासून हे गुंड वारंवार येऊन त्रास देत आहेत. काही गुन्हेगार तडीपार असूनही या भागात मुक्तपणे वावरतात, हे पाहून रहिवाशांना धक्का बसला आहे.
“आम्हाला असे वाटते की आमच्या सुरक्षिततेला धोका आहे, आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे काही नागरिकांनी स्पष्ट केले. या गंभीर परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार योगेश राजापूरकर व वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शेंडगे यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन पोलीस प्रशासनाशी सकारात्मक चर्चा केली.
त्यांनी पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली. “दहशत पसरवणाऱ्या गुंडांना आळा घालणे आणि कायदा सुव्यवस्था टिकवणे गरजेचे आहे,” असे राजापूरकर यांनी सांगितले.
आता संपूर्ण वसंतनगर परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लागल्या आहेत.
गुंडगिरीला लगाम घालण्यासाठी आणि परिसरात पुन्हा शांती प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना होईल का?