चिंचवड विधानसभेत मोठी राजकीय अपडेट: चंद्रकांत नखाते यांचा भाजपला राम राम, जगताप यांच्या घराणेशाही व हुकूमशाहीला वैतागल्याचा पत्रात उल्लेख


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) वाकड, ता. ७ : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मोठी राजकीय अपडेट समोर येते आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी महायुती आणि भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना विरोध करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीला ते इच्छुक होते, तेव्हाही त्यांनी पक्षाकडे जगताप यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. जगताप यांच्या विरोधात इतरही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केलेली मात्र नंतर त्यांनी जुळवून घेतले पण नखाते यांनी मात्र विरोध कायम ठेवत आज भाजपला राम राम केला.
जगताप यांच्या घराणेशाहीला पक्ष कायमच प्राधान्य देत आला आहे. सलग १५ वर्ष नगरसेवक असूनही प्रत्येक वेळी मला डावलण्यात आले. चिंचवड विधानसभेत पक्षांतर्गत हुकुमशाही चालु आहे. असा घाणाघाती आरोप करत भाजपाचे नेते चंद्रकांत नखाते यांनी प्रदेश सदस्य पदाचा राजीनामा देणाऱ्या पत्रात केलेला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला आहे. विधानसभेला मी इच्छुक असताना, जगताप यांच्या घराणेशाहीलाच प्राधान्य देत त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. जगताप कुटुंबियांवर मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. एवढी नाराजी असताना शिवाय त्यांच्याकडे शहराध्यक्ष पद असूनही त्यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आम्ही दोनवेळा आमदार केले. त्यांच्या निधनानंतर पत्नींला उमेदवारी दिली. त्यावेळीही आम्ही आक्षेप घेतला नाही. आता पुन्हा त्यांच्याच घरात उमेदवारी देण्यात आली. जगताप यांनी शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना नियमितपणे बैठकीचे निमंत्रण दिले नाही, आम्हाला डावलून पक्षाचे कार्यक्रम घेतले. त्यांच्याबद्दल नाराजी असताना पक्षाने पुन्हा त्यांनाच संधी दिली आहे.
जगताप यांना पक्षाने दिलेली उमेदवारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलेली नाही. म्हणुन मी या सर्व त्रासाला कंटाळून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत मी पक्षाची विचारधारा तळागाळात रुजविण्याचे प्रामाणिक काम केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना २०१४, २०१९ च्या निवडणूकीत मताधिक्य देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या निधनानंतर पक्षाचा आदेश मानून त्यांच्याच पत्नीला पोटनिवडणुकीत निवडून आणले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत रहाटणी प्रभागात पॅनल प्रमुख म्हणून स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन भाजपाचे माझ्यासह ४ नगरसेवक बहुमताने निवडून आणले.
महापालिकेत भाजपाची सत्ता अल्यानंतर पाच वर्षाच्या कार्यकाळात जगताप कुटुंबियांनी आम्हाला एकही पद मिळू दिले नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता या मानाच्या पदासाठी इच्छुक असताना देखील मी पंधरा वर्षे नगरसेवक असून सुद्धा मला डावलून नवख्या नगरसेवकांना संधी देण्यात आली. पक्षाशी एकनिष्ठ राहून सुद्धा पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाला. याची वरिष्ठांना पूर्व कल्पना दिली होती. वरीष्ठांकडून न्याय मिळेल, यावर विश्वास ठेऊन पक्षाचे इमाने इतबारे काम करत राहिलो. असे राजिनामा पत्रात म्हटले आहे