पुणे मेट्रो जागेतील अतिक्रमनावर महापालिकेचा हातोडा


पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मेट्रोच्या जागेत उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर कारवाई करून त्या काढून टाकण्यात आल्या. पहाटे साडेपाच ते दहा या वेळेत ही कारवाई करण्यात आली.
मेट्रोची स्थानके उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागा महापालिकेने मेट्रोकडे हस्तांतरित केलेल्या आहेत. महापालिकेकडून देण्यात आलेल्या या जागांची काळजी घेणे, निगा राखणे, त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देण्याची जबाबदारी महामेट्रोची आहे. मात्र महामेट्रो प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
यामुळेच जिल्हा न्यायालय, डेक्कन जिमखाना यासह काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. याकडे आता मेट्रोने गांभीर्याने पाहून यापुढील काळात अतिक्रमणे होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पुणे महपालिकेचे परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सहायक महापालिका आयुक्त गोविंद दांगट, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ४ पोलीस निरीक्षक, सुरक्षा अधिकारी व इतर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते
.मेट्रोच्या जागेतील बेकायदा अतिक्रमण काढून टाकण्यात आले आणि येथील साहित्य मेट्रो विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेट्रोकडून मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोलकुमार मोहोळकर उपस्थित होते
शिवाजीनगर दिवाणी न्यायालय (सिव्हिल कोर्ट) मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या ५० झोपड्यांवर कारवाई केली. मेट्रोच्या जागेत या बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या होत्या.
अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी पुणे मेट्रोच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली होती.
त्यामध्ये शहरातील रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेतील विविध विभागांना दिले आहेत.
