दहावीच्या विद्यार्थ्यांनो, दुपारी झोपायची सवय असेल, तर ती आत्ताच बंद करा -उद्योजक रामदास काकडे


दहावीच्या विद्यार्थ्यांनो, दुपारी झोपायची सवय असेल, तर ती आत्ताच बंद करा : उद्योजक रामदास काकडे
लायन्स क्लब, स्टेप्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन तर्फे ‘यशस्वी भव’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
पिंपरी, दि. ३०- (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
दहावीची परीक्षा ही एकूणच आयुष्यात अत्यंत महत्त्वाची, पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी आणि यशाची पायाभरणी करणारी आहे. आपण कुठे कमी पडतोय, प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नात गुण कमी झाले आहेत, कुठली गोष्ट व्यवस्थित जमलेली नाही, याचे निरीक्षण करून शिक्षकांकडून शंकाचे निरसन करून घ्या. दुपारच्या वेळेत परीक्षा असल्याने दुपारी झोपायची सवय असलेल्यांनी ती आत्ताच बंद करा, म्हणजे परीक्षा कालावधीत दुपारी झोप येऊन त्याचा परीक्षेवर परिणाम होणार नाही. याबरोबरच आतापासूनच आपण परीक्षेमध्ये जो पेन, पेन्सिल वापरणार आहात, त्याने लिहायचा सराव करा, म्हणजे पेपर लिहायला सोपेपणा येईल. किमान दोन-तीन तास एका जागेवरून न हल्ल्याची सवय लावा, असा कानमंत्र प्रसिद्ध उद्योजक व इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन, स्टेप्स फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे तणाव विरहित दहावी बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे, या हेतूने ‘यशस्वी भव’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना रामदास काकडे बोलत होते. यावेळी लायन्स इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट 3234D2 चे उपप्रांतपाल ला. राजेश अग्रवाल, स्टेप्स फाउंडेशनचे संस्थापक संदेश मुखेडकर, गुरुकुल फाउंडेशनचे संस्थापिका नीलम कौशल, ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र धारूरकर, संजीवनी डिंबळे, ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक प्रदीप रॉय, लायन्स इनोव्हेशन क्लबचे प्रेसिडेंट ला. गोपाळ बिरारी, प्रा. भक्ती मुखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संतोष पाचपुते, प्रा. मनोज चौधरी, डॉ. शोभना पवार, प्रा. स्वाती विठूळे, प्रा. नीलम कौशल, प्रा. ओमप्रकाश मारे, प्रा. संदेश मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्राचे अध्यक्ष लॉयन संदीप पोलकम होते. यावेळी विजय शिनकर, सचिव किशोरी हरणे, खजिनदार एकनाथ चौधरी, प्रा. अश्विन गुडसूरकर, प्रा. दिपाली नारगुंडे, प्रा. सविता विभुते, प्रा. संदीप मोरे उपस्थित होते.
रामदास काकडे पुढे म्हणाले, की दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी आपले बालपण यशस्वी करून प्रौढावस्थेकडे मार्गक्रमण करण्याचा हा टप्पा आहे. जीवनातील पहिले पाऊल यशस्वी करण्यासाठी दहावीची परीक्षा ही महत्त्वाची आहे. इथूनच करिअरचे सर्व मार्ग खुले होतात. एकीकडे शारीरिक व मानसिकतेत बदल होत असतो, तर दुसरीकडे अभ्यासाचा ताण, ही दोन विरुद्ध टोके असतात. तसेच एकीकडे खेळावे वाटते, तर दुसरीकडे अभ्यास करायचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा जास्त ताण न घेता अभ्यासासोबतच थोडे खेळलेही पाहिजे. दिवसभर अभ्यासच घेऊन बसलात तर एका मर्यादेनंतर अभ्यासात लक्ष लागत नाही. खेळल्यामुळे तुम्ही मोकळ्या मनाने परीक्षेला सामोरे जाल. परीक्षा कालावधीमध्ये वेळापत्रक हे पाळायलाच हवे. तुमची परीक्षा उद्या आहे, या दृष्टीने तयारी करा. संधी एवढीच आहे, त्यामुळे जीव ओतून अभ्यास करा. परिस्थितीचे कारण आड येऊ देऊ नका. पूर्ण क्षमतेने अभ्यासात झोकून दिले; तर यश तुमचेच आहे, असा कानमंत्रही रामदास काकडे यांनी दिला.
राजेश अग्रवाल यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण न घेता मोकळ्या मनाने परीक्षेला जाण्याचे आवाहन केले. गोपाळ बिरारी म्हणाले, की आज तुम्ही कुंभाराचे मडके आहात, ते पक्के होत आहे. त्यातीलच दहावीचा महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षा कालावधीत जेवढी मेहनत कराल तेवढे मोठे यश मिळेल.
संदेश मुखेडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले, की आपण वर्षभर अभ्यासाची चांगली तयारी केली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या अभ्यासाची उजळणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने एकाग्र होऊन अभ्यास करा, यश तुमचेच आहे.
प्रा. नीलम कौशल म्हणाल्या, दहावीची संधी एवढीच आहे, त्यामुळे मन लावून ओतून अभ्यास करा. भले आपली परिस्थिती कशीही असो, त्याचा बाऊ करू नका.
सूत्रसंचालन मोरया अकॅडमीचे संस्थापक प्रा. नितीन साळी यांनी केले.