शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत ठेकेदार महत्त्वाचा घटक – आ. शंकर जगताप


इकॅम संस्थेच्या पिंपरी चिंचवड विभागीय शाखेची स्थापना
पिंपरी, पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)भारतातील प्रत्येक घरात वीज पुरवठा देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत सोलर सारखा अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवून, ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी विद्युत ठेकेदारांना खूप काम करावे लागणार आहे. विद्युत ठेकेदारांनी आता आधुनिकतेचा स्विकार केला पाहिजे. वेगाने वाढत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो, रस्ते, अनेक व्यावसायिक, निवासी बांधकाम प्रकल्प विकसित करण्यासाठी, शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी विद्युत ठेकेदार महत्त्वाचा घटक असणार आहे. विद्युत ठेकेदारांची इकॅम सारखी संस्था शहरात होणे आवश्यक होते असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
राज्यातील विद्युत ठेकेदारांच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि पिंपरी चिंचवड विभागीय शाखा स्थापनेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. जगताप बोलत होते. यावेळी इकॅम महाराष्ट्र अध्यक्ष उमेश रेखे, सचिव देवांग ठाकूर, इकॅम पिंपरी चिंचवड अध्यक्ष सयाजी पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कदम जळगाव अध्यक्ष बाबुभाई मेंहदी, महाराष्ट्र माजी अध्यक्ष वामन भुरे, अहिल्यानगर अध्यक्ष दत्ता झिंजुर्डे, धुळे – नंदुरबार अध्यक्ष प्रवीण बडगुजर, पिंपरी चिंचवड सचिव रमेश भालेराव, खजिनदार संजय कुमार, सहसचिव गजानन पेटसांगवे, मुख्य कार्यालय संचालक मंगेश लोडम, पिंपरी चिंचवड संचालक विजय काकडे, विजय शहाणे, बाबासाहेब जोंधळे आदींसह पिंपरी चिंचवड शहरातील सभासद तसेच राज्यभरातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक करताना पिंपरी चिंचवड अध्यक्ष सयाजी पाटील यांनी सांगितले की, इकॅमच्या शताब्दी वर्षामध्ये पिंपरी चिंचवड विभागीय शाखेला मान्यता मिळणे हे गौरवास्पद आहे. यासाठी मागील पंधरा वर्षापासून पाठपुरावा करण्यात येत होता. महाराष्ट्र असोसिएशनने पिंपरी चिंचवडच्या सभासदांवर दाखवलेला हा विश्वास निश्चितच सार्थ ठरवू. आमदार शंकर जगताप यांनी निवडून आल्यानंतर पहिल्याच विधानसभा अधिवेशनात महावितरणच्या विषयावर चर्चा घडवून आणली, असेच पुढील काळात देखील मिळावे अशी अपेक्षा सभासदांच्या वतीने पाटील यांनी व्यक्त केली.