वास्तुरचनाकाराला आयुष्यात अमर्याद संधी – विकास आचलकर


एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दशकोत्सव एक्झिबिशन

पिंपरी पुणे (दि. २२ फेब्रुवारी २०२५) (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) वास्तू रचनाकाराला आपल्या उद्योग व्यवसायात नाव कमवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या खडतर प्रवासामध्ये अनुभव घेऊन नवीन वास्तू उभारणीमध्ये कौशल्य वापरून मूर्त स्वरूप देण्याचे कार्य करता येते. यातून मिळणारे समाधान अमूल्य असते. अनुभव घेत गेलात की काही वर्षांनंतर वास्तुरचनाकाराला स्थैर्य, समृध्दी, संपन्नता येते. त्यातून अमर्याद संधी उपलब्ध होतात असे मार्गदर्शन आयआयएचे अध्यक्ष आर्किटेक्ट विकास आचलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पीसीईटी संचालित निगडी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय (२१, २२ फेब्रुवारी) दशकोत्सव एक्झिबिशन आणि शोकेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच दहा वर्षांत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सादर केलेले प्रकल्प, मिळविलेली बक्षिसे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुर्यवंशी, आर्किटेक्ट प्रा. शिल्पा पाटील, शिरिष मोरे आदी उपस्थित होते.
एस. बी. पाटील आर्किटेक्चरच्या जडणघडणीत पीसीईटी विश्वस्त मंडळाचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धांबरोबरच अन्य स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. संस्था विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य करीत आहे, असे डॉ. स्मिता सुर्यवंशी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.