उद्योगाला अध्यात्माची जोड हवी, हा स्वामी विवेकानंदांचा विचार टाटांनी प्रत्यक्षात उतरवला : श्रीपाल सबनीस

उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार यशस्वी उद्योजक संदीप पवार यांना प्रदान


पिंपरी, प्रतिनिधी : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) सर्वांना नोकऱ्या देणे सरकारला शक्य नाही. रोजगाराच्या दृष्टीने कृषी क्षेत्र कमी पडत असल्याने उद्योग क्षेत्राला जवळ करणे क्रमप्राप्त ठरते. अध्यात्म आणि उद्योग हे हातात हात घालून पुढे जातील, हा स्वामी विवेकानंद यांचा विचार जे. आर. डी. टाटा यांनी महत्वाचा मानला. आज जो टाटा उद्योग समूह दिसतो आहे, तो या विचारांमुळेच, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योग महर्षी रतन टाटा पुरस्कारांचे वितरण ऑटो क्लस्टर सभागृह येथे पार पडले. यावेळी मावळमधील यशस्वी उद्योजक संदीप पवार यांना उद्योग महर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान, नवनाथ कोलते यांना उद्योगरत्न पुरस्कार, राम काळे यांना उद्योगभूषण पुरस्कार रुपाली पाटील यांना उद्योग सखी पुरस्कार, नेताजी पाटील यांना उद्योग विकास पुरस्कार, मनोज ढमाले यांना दुग्ध उद्योगभूषण पुरस्कार, पांडुरंग जितकर यांनासौरऊर्जा उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, टाटा उद्योग समूहाचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर, कृषिभूषण सुदाम भोरे, कामगारभूषण पुरूषोत्तम सदाफुले, शिवाजीराव पवार, उज्ज्वलाताई गोकुळे, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, मावळ पंचायत समिती माजी उपसभापती शांताराम कदम, जनार्दन भेगडे, काळुराम कलाटे, राजेंद्र देशपांडे, नितीन कड आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना संदीप पवार म्हणाले, की टाटा यांच्या विचाराने मार्गक्रमण करीत आलो आहे. त्यांच्या विचारातूनच पुढील वाटचालीला उर्मी मिळाली. आई – वडील, पत्नी, कामगार, तसेच ज्या ज्या हातांनी हा उद्योग पुढे नेण्यास हातभार लावला, या सर्वांना या पुरस्काराचे श्रेय जाते. प्रत्येक तरुणाने जेआरडी टाटांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही जे जे करा ते सर्वोत्तम करा, हा टाटांचा विचार तरुणाईने अंगीकारणे गरजेचे आहे.सचिन इटकर म्हणाले, की जेआरडी टाटा, रतन टाटा यांची मूल्ये उद्योजकांनी रुजवली पाहिजेत. उद्योजकांनी निर्माण केलेल्या संपत्तीतील काही भाग समाजहितासाठी दिला पाहिजे. विकसित भारत घडविण्यासाठी उद्योजक तयार झाले पाहिजेत
मनोहर पारळकर म्हणाले, जेआरडी टाटा हे विशिष्ट विचाराने वागणारे उद्योजक होते. त्यांच्या विचाराने चालल्यानेच आज अनेकजण उद्योग क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. उद्योगात शिरण्यासाठी धाडस लागते लहानपणापासून उद्योग रुजवणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी, तर आभार सीमाताई गांधी यांनी मानले.

Latest News