HSRP Plate :RTO केंद्रांवर पाटी बसवून मिळणार आहे -स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पुणे शहरात आरटीओच्या आकडेवारीनुसार सुमारे २५ लाखांहून अधिक जुने वाहनधारक आहेत. या वाहनधारकांना ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, वाहनधारकांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत पुणे शहरातून एक लाख १२ हजार ५४८ वाहनधारकांनी नोंदणी केली आहे.

परिवहन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्यथा एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

त्यापैकी २५ हजार ४३ वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी बसविण्यात आली आहे.एकंदरीत नोंदणीचे प्रमाण जास्त असून, पाटी बसविण्याच्या प्रमाणात विलंब होत आहे. प्रतीक्षा कालावधी देखील वाढत असून, मुदत संपुष्टात येण्यासाठी ५५ दिवस शिल्लक राहिले आहेत.

अधिकृत ६९ केंद्र चालकांवरही ताण येत असल्याने आरटीओकडून केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आता ५५ केंद्र नव्याने वाढविण्यात आल्याने १२४ केंद्रांवर सुविधा मिळणार असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली

उप प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठीच्या केंद्रांत वाढ केली आहे. आरटीओने दिलेल्या मुदतीच्या दिवसात घट होत असून, नोंदणीधारकांच्या प्रतीक्षेचा कालावधी ३० दिवसांहून अधिक आहे.

हा प्रतीक्षा कालावधी ८ ते १० दिवसांवर आणण्याच्या दृष्टीने पुणे आरटीओकडून नव्याने ५५ केंद्रांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना नोंदणी केल्यानंतर आठ दिवसांत उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावून मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे

पुण्यातील आढावा

  • पूर्वीचे एचएसआरपी केंद्र – ६९
  • नव्याने वाढविलेले केंद्र – ५५
  • एकूण केंद्र – १२४
  • नोंदणी केलेले वाहनधारक – १,१२,५४८
  • प्रतीक्षेतील वाहनधारक – ३८,३८९
  • उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसविलेले – २५,०४३

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यातच मुदतीचे दिवस शिल्लक राहिले असून, प्रतीक्षा कालावधी २५ ते ३५ दिवसांचा होत आहे. हा कालावधी ८ ते १० दिवसांपर्यंत आणण्यासाठी उत्पादक आणि सेवा कंपन्यांना सूचना करून केंद्र वाढविण्याबाबत सूचना केल्या होत्या. नव्याने ५५ केंद्र वाढविले असून, १२४ केंद्रांवर पाटी बसवून मिळणार आहे. 

-स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Latest News