पुण्यात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी, योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी विविध स्तरांवर सर्वेक्षण…

पुणे(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, पुण्यात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी सात ते आठ जण इच्छुक आहेत. त्यामुळे योग्य उमेदवार निवडणे भाजप नेतृत्वासाठी मोठे आव्हान आहे.

त्यामुळेच विविध स्तरांवर सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.या सर्वेक्षणातून उमेदवारांची लोकप्रियता, कामगिरी आणि पक्षाशी असलेली निष्ठा तपासली जाईल.

जातीय समीकरणेही महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे यंदाची महापालिकेची उमेदवारी सर्वेक्षणातील निष्कर्षांवर आधारित असेल.

लोकप्रियता गमावलेले, जनतेशी संपर्क नसलेले किंवा कमी कार्यक्षम माजी नगरसेवक यामुळे मागे पडू शकतात. पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

मुंबई आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

पुणे महानगरपालिकेत महायुती म्हणून लढायचे की स्वबळावर, याचा निर्णय अद्याप झालेला नसला तरी भाजपने उमेदवारांची निवड करण्यासाठी नेहमीचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना भाजपने सर्वेक्षण केले होते. पुणे महापालिका निवडणुकीतही उमेदवारांची निवड करण्यासाठी तेच तंत्र वापरले जाणार आहे

. इच्छुक उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी विविध स्तरांवर सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे सर्वेक्षणात जो उमेदवार पुढे असेल, तोच उमेदवारीचा प्रमुख दावेदार असेल.भाजपचे हे सर्वेक्षण तीन स्तरांवर असेल: केंद्रीय, प्रदेश आणि संघटनात्मक. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुकांना तीन कसोट्यांमधून जावे लागेल. यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

Latest News